महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) त्यांच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस १५ मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे देण्यात आले आहेत.

एसटी बसेससाठी लांबच्या प्रवासादरम्यान विविध थांबे निश्चित करण्यात आले आहेत. काही चालक-वाहक प्रवाशांना जेवणासह इतर सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून जास्त वेळ बस थांबवून ठेवतात. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांचा प्रवास कालावधी लांबतो. परिणामी प्रवासी एसटीचा पर्याय कमी निवडतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभाग नियंत्रकाला  चालक-वाहकांना स्पष्ट सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. या चालक-वाहकांना त्याबाबत बसमधील प्रवाशांनाही तशी सूचना द्यायची आहे. सोबतच मार्ग तपासणीपथक आणि पर्यवेक्षकांना वेळोवेळी पाहणी करून थांब्यावर १५ मिनिटांहून अधिक काळ बस थांबताना दिसल्यास संबंधित यंत्रणेला सूचना द्यायची आहे. त्यानंतर संबंधित बसच्या चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

नागपूर विभागात तीन  हॉटेलवर एसटीचे थांबे आहेत. मध्यंतरी अनधिकृत थांब्यावर थांबल्याने संबंधितांवर प्रशासनाने कारवाई केली होती. आता विनावाहक बस फेरी बंद असल्याने सहसा हॉटेलवर थांबे नाहीत. परंतु कारवाईचे आदेश मिळाल्यावर प्रशासनाने सर्वत्र लक्ष केंद्रित केले आहे.

– नितीन बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ (नागपूर विभाग)