नागपूर : रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून ठेवणे उपराजधानीत सर्रासपणे दिसते. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताही मोठय़ा प्रमाणात होतात. वाहतूकदारांच्या या सवयीला पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रिंगरोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या जड वाहनांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. गुरुवारपासून शहरातील अनेक पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई सुरू झाली आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था व वाहतूक कोंडीसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने अनेकदा रस्त्याच्या कडेला बेवारसपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांसंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. शेवटी  आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या जड वाहनांवर कारवाईचा निर्णय घेतला. प्रथम वाहनाच्या मालकांना बोलावून त्यांना ते आपल्या वाहनतळाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचे आदेश देण्यात येते. पण, वाहतूकदार न ऐकल्यास त्या वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात येते. ही मोहीम दोन दिवसांपासून सध्या कळमना, यशोधरानगर, कपीलनगर आणि जरीपटका या रिंगरोड परिसरात सुरू आहे.