केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूरमध्ये गौप्यस्फोट
पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी आपल्या नावाची नेत्यांनी शिफारस करावी म्हणून विविध क्षेत्रातील नामवंतांकडून प्रयत्न केले जातात व त्यांचे मन राखण्यासाठी नेत्यांकडूनही शिफारस पत्रे वाटली जातात, असा गौप्यस्फोट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला.
नामवंत ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांच्या नावाचा उल्लेखही त्यांनी या संदर्भात केला.
सेवासदनच्या नागपूर शाखेतर्फे शनिवारी नागपूर येथे शिक्षण-प्रबोधन पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात गडकरी पूर्णवेळ उपस्थित होते. पुरस्कारासाठी अर्ज न मागवता व्यक्ती किंवा संस्थांच्या कार्याची माहिती घेऊन निवड करा, असे आवाहन करताना गडकरी यांनी त्यांना पुरस्कारासाठी कराव्या लागणाऱ्या शिफारशींचा मुद्दा उपस्थित केला.
राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस करावी म्हणून अनेक मान्यवरांकडून नेत्यांना विनंती केली जाते. नाराज होऊ नये म्हणून शेकडो लोकांना शिफारसपत्रे द्यावी लागतात, तशी मी सुद्धा देतो. पुरस्काराची भूक ही शमत नाही तर ती वाढतच जाते. पद्मश्री प्राप्त करणाऱ्यांना पद्मविभूषण हवे असते, हे सांगताना त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या भेटीचा किस्साही सांगितला.
मुंबईत त्या १२ मजले चढून मला भेटायला आल्या होत्या. पद्मश्री मिळाली आहे, पण पद्मभूषणसाठी तुम्ही प्रयत्न करा, अशी विनंती त्यांनी केली होती, असे गडकरी म्हणाले.
या कार्यक्रमात नितिन गडकरी यांनी आशा पारेख यांच्या हिंदी चित्रपट क्षेत्रातील आजवरच्या प्रदीर्घ कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेखही केला.