हैदराबादमध्ये एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या प्रकरणातील चार आरोपींना पोलीस चकमकीत ठार मारण्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पण ती न्यायालयीन प्रक्रियेतूनच व्हावी, आरोपींना चकमकीत ठार मारणे अयोग्य आहे,अशा प्रतिक्रिया महिला संघटना आणि वकिलांनी व्यक्त केल्या आहेत.

कायद्याचा धाक उरलेला नाही

हैदराबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस चकमकीत ठार मारणे ही त्यांना मिळालेली शिक्षाच आहे. अनेक वर्षे बलात्काराचे खटले चालतात. त्यामुळे आरोपींना कायद्याचा धाक उरलेला नाही. हैदराबाद पोलिसांच्या कारवाईमुळे महिलांवरील  अत्याचाराच्या अशा घटनांना आळा बसणार असला तरी यामुळे चुकीचे पायंडे पडण्याची शक्यता आहे. आरोपींना कायद्यानेच कडक शिक्षा व्हावी. – डॉ. सीमा साखरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां, स्त्रीमुक्ती संघटना.

खटले तातडीने निकाली निघावे

हैद्राबादेतील घटनेनंतर देशभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी जनभावना होती. त्यामुळेच आरोपींना पोलीस चकमकीत ठार मारणे योग्य ठरते. परंतु नेहमी असे घडू नये. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, त्यासाठी खटले तातडीने निकाली निघायला हवे यासाठी प्रयत्न हवे.– डॉ. रूपा कुळकर्णी, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ता

कायद्याचे राज्य धोक्यात

देशात कायद्याचे राज्य असून प्रत्येकाची भूमिका ठरवून दिलेली आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास करून आरोपी व पुरावे न्यायालयासमोर हजर करायला हवे. न्यायपालिका सर्व पुरावे तपासून दोषींना योग्य ती शिक्षा सुनावेल. पण, हैदराबाद  सारख्या घटनांमुळे कुणीही कायदा हाती घेईल. यामुळे कायद्याचे राज्य ही संकल्पनाच धोक्यात येण्याची शक्यता आहे. – अ‍ॅड. डॉ. रेणुका सिरपूरकर

चकमक असंवैधानिक

हैदराबादमधील बलात्काराची घटना निंदनीय आहे. पण, गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास करून आरोपींना अटक करणे, पुरावे गाळे करणे आणि ते न्यायालयासमोर ठेवणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. एकंदर परिस्थिती बघता हैदराबादमध्ये घडलेली चकमक ही अनैसर्गिक वाटते.  ही घटनाच असंवैधानिक असून असा पायंडा पडायला नको. समाजाची मानसिकता दिवसेंदिवस हिंसक होत असल्याने जया बच्चन यांच्या संसदेतील भाषणातून दिसून येते. बलात्कारातील अनेक उच्चभ्रू व्यक्ती समाजात राजरोसपणे फिरत असून पीडित मुलगी व तिच्या कुटुंबांवर जीवघेणे हल्ले करीत आहेत. आरोपींना संपवण्यासाठी अशा चकमकी झाल्या तर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. – अ‍ॅड. फिरदोस मिर्झा

शिक्षा न्यायालयीन प्रक्रियेतूनच व्हावी

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पण ती न्यायालयीन प्रक्रियेतून  व्हावी. पोलीस चकमकीत त्यांना ठार मारणे निषेधार्ह आहे. हैद्राबादमधील प्रकरणात पोलिसांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे. असा जर पायंडा पडला तर अक्कू  यादव सारख्या घटना घडतील. आरोपी पळून जात असेल तर त्यांना जखमी करता आले असते. मात्र त्यांना ठार मारण्याचे समर्थन करत नाही.

– माधुरी साकुळकर, महाराष्ट्र संघटक, भारतीय स्त्री शक्ती चकमकीची न्यायालयीन

चौकशी व्हावी

महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना निंदनीय आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी पण, याचे अधिकार न्यायालयाला आहेत. समाजभावना लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींना ताबडतोब अटक करावी आणि द्रूतगती न्यायालयांमध्ये खटला चालवून आरोपींना शिक्षा करायला हवी. पण, पोलिसांनीच कायदा हाती घेऊन बनावट चकमक घडवून आणणे हे कायद्याच्या राज्यात योग्य नाही. या चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. – अ‍ॅड. नाझीया पठाण