केंद्राच्या पावलावर पाऊल टाकून उत्साहाच्या भरात राज्य शासनाने आमदारांसाठी ‘आदर्श ग्राम’ योजनेची घोषणा केली खरी, पण मतदारसंघातील एक गाव आदर्श म्हणून विकसित केले तर इतर गावे नाराज होतात, त्यामुळे ग्रामीण भागातील आमदारांपुढे पेच निर्माण झाला आहे. शहरातील आमदार ग्रामीण भागातील गावांवर निधी खर्च करण्याच अनिच्छूक आहेत. त्यामुळे सध्यातरी या योजनेच्या पातळीवर अनास्था आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना पाच वर्षांत तीन गावे दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्याच धरतीवर राज्य शासनाने आमदारांसाठी आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली. केंद्र सरकारच्या योजनेत खासदारांना त्यांच्या विकास निधीतून आणि इतर सरकारी योजनांच्या माध्यमातून ही गावे विकसित करायची आहेत. राज्य शासनानेही या योजनेसाठी वेगळा निधी देण्याचे अद्याप जाहीर केले नाही. त्यामुळे अमदारांना त्यांच्या विकास निधीतूनच गाव विकसित करावे लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघात आमदारांना सर्व गावांचा समान विकास करायचा असतो, त्यामुळे त्यांच्या विकास निधीचे वाटप करताना ते सर्व गावात विविध सोयी सुविधांसाठी ठराविक प्रमाणात निधी देतात. त्यातून स्थानिक पातळीवर राजकारणातही त्यांना फायदा होतो. आदर्श ग्राम योजनेत एकाच गावाचा विकास केला तर इतर गावांमध्ये नाराजी पसरू शकते व त्याचा फटका राजकारणात बसू शकतो, अशी भीती आमदारांना आहेत.
असाच काहीसा प्रकार शहरी भागातील आमदारांच्या बाबतीतही आहे. शहरातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघाबाहेरील गाव दत्तक घ्यावे लागणार आहे. तेथे त्यांचा विकास निधी खर्च होणार आहे. यापेक्षा मतदारसंघात निधी खर्च केला, तर पुढच्या निवडणुकीत फायदा होईल, असे त्यांना वाटते, पण सध्या कोणाकडेच यावर पर्याय नाही. त्यामुळे आमदार अनिच्छेनेच आदर्श ग्राम योजनेत सहभागी होताना दिसत आहेत.
नागपूर जिल्ह्य़ात विधानसभेचे १२ आणि विधान परिषदेचे ५, असे एकूण १७ आमदार आहेत. यापैकी विधानसभेच्या चार सदस्यांनी म्हणजे विकास कुंभारे (मध्य नागपूर) आणि डॉ. मिलिंद माने (उत्तर नागपूर), ग्रामीणमध्ये सुनील केदार (सावनेर) व सुधीर पारवे (उमरेड) यांनी अद्याप गावे दत्तक घेतलेली नाहीत. विधान परिषदेच्या तीन सदस्यांनी म्हणजे, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र मुळक (दोन्ही काँग्रेस) आणि प्रकाश गजभिये (राष्ट्रवादी) यांनी अद्याप गावांची निवड केलेली नाही. मुळक यांचा कार्यकाळाचे हे शेवटचे वर्ष आहे. दक्षिण-पश्चिमचे आमदार व राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आदर्श ग्रामसाठी फेटरी (ता. नागपूर) ची निवड केली आहे.
आमदारांनी घेतलेल्या दत्तक गावांची यादी
आमदार गाव
१) देवेंद्र फडणवीस फेटरी (नागपूर ग्रामीण)
२) सुधाकर देशमुख पारडी (घटाटे, ता. नागपूर)
३) सुधाकर कोहळे लोणखैरी (ता. कामठी)
४) कृष्णा खोपडे कापसी खुर्द (ता. नागपूर)
५) आशीष देशमुख थुगाव देव (नरखेड)
६) समीर मेघे अडेगाव (हिंगणा)
७) मल्लीकार्जून रेड्डी चारगाव (ता. रामटेक)
८) चंद्रशेखर बावनकुळे विहिरगाव, धर्मापुरी, सुरादेवी
९) नागो गाणार गोठणगाव (ता. कुही)
१०) अनिल सोले रोंगा (तुमसर, जि. भंडारा)