विलगीकरण केंद्रातील नागरिकांचा गोंधळ, पोलिसांना पाचारण

नागपूर : आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात सलग दुसऱ्या दिवशी प्रशासनाने दुपारी २.३० वाजता जेवण पाठवल्याने सक्तीने विलगीकरणात असलेल्या संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने येथे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. जेवण वेळेवर मिळत नसल्याने येथील मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या काही व्यक्तींना प्रचंड मन:स्ताप होत आहे. रविवारी एकदा हा प्रकार घडल्यावरही सोमवारी पुन्हा विलंबाने जेवण दिल्याने येथील व्यवस्थेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

आमदार निवासातील दोन इमारतींमध्ये करोनाबाधितांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या व्यक्तींना मोठय़ा प्रमाणावर खबरदारी म्हणून सक्तीने विलगीकरणात ठेवले जात आहे. या सगळ्यांच्या आंघोळीसाठी साबण, जेवण, चहा-नाश्त्यापर्यंतची सोय प्रशासनाकडून केली जाते. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी येथे नागरिकांना चक्क अडीच वाजता विलंबाने जेवण दिले गेले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत गोंधळ घातला. ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठल्यावर त्यांच्या उपस्थितीत काहींना जेवणाचे वितरण केले गेले.

रविवारी येथे जेवणात अळ्या सापडण्यासह निकृष्ट जेवण मिळाल्याने नागरिकांनी गोंधळ घातला होता. परंतु दुसऱ्या दिवशी प्रशासनाने येथील व्यवस्थेत सुधारणा न करताच पुन्हा जेवण विलंबाने दिल्याने नागरिकांचा प्रशासनावरील संताप वाढल्याचे चित्र होते. या विषयावर उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे यांच्याशी भ्रमणध्वनीवर दुपारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

लहान मुलांचे हाल ; पालक चिंतित!

आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात लहान मुलांची संख्या मोठी आहे. आई-वडील मुलांना घरी सकस जेवण, पौष्टिक पदार्थ किंवा दूध, बिस्किट देतात. येथे मात्र मुलांसाठी दुधासह इतर पदार्थ दिले जात नाहीत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून माझ्या तीन वर्षीय मुलाला येथे केवळ पोळी देऊन वेळ काढत असल्याची माहिती एका आईने ‘लोकसत्ता’ला दिली. आम्ही कुणाच्या संपर्कात आलो नाही. तरीही खबरदारी म्हणून प्रसंगी आम्हाला आमच्या घरात विलगीकरणात ठेवा, किमान आमच्या मुलाला आम्ही पौष्टिक जेवण देऊ, अशी व्यथा या आईने व्यक्त केली.