शिकवणी वर्गांचे दस्तावेज दिल्लीला रवाना

नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ‘नीट’ परीक्षेत मूळ विद्यार्थ्यांच्या नावावर डमी उमेदवार उभे करणारे मोठे षडयंत्र उघडकीस आले असून यात नागपुरातील शिकवणी वर्गांचे नाव समोर आले आहे. येथील दोन शिकवणी वर्गांतून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त केले असून ते घेऊन काही अधिकारी बुधवारी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ सप्टेंबरला देशभरात नीटची परीक्षा झाली. नीटमध्ये चांगले गुण मिळवून देणे आणि देशातील नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून सक्करदरा परिसरातील आर. के. एज्युकेशन अ‍ॅण्ड करिअर गाइडन्स आणि नंदनवन, गणेशनगर परिसरातील कॅरिअर पॉइंट या शिकवणी वर्गांच्या संचालकांनी ५० लाख रुपये घेतले. त्याकरिता वेगवेगळ्या रकमेचे भविष्यातील तारखेचे धनादेश घेण्यात आले व हमी म्हणून विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेसह महत्त्वाचे दस्तावेज त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतले.

नागपूरमधील विद्यार्थ्यांचे बनावट आधारकार्ड आणि इतर दस्तावेज तयार करून त्यांना नीटसाठी दिल्लीतील परीक्षा केंद्र मिळवून देण्यात आले. या परीक्षा केंद्रांवर मूळ विद्यार्थ्यांऐवजी डमी उमेदवारांनी परीक्षा दिली. हा प्रकार सीबीआयच्या लक्षात आला. दिल्लीतील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. यात दोन्ही शिकवणी वर्गांचे संचालक परिमल व अंकित यांचाही समावेश आहे. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. यानंतर दिल्ली सीबीआयच्या आदेशानुसार नागपूर सीबीआयने या दोन्ही शिकवणी वर्गांना टाळे ठोकून मंगळवारी  कारवाई केली. यात विद्यार्थी, त्यांची माहिती, दस्तावेज आणि संगणक आदी साहित्य जप्त करण्यात आले. हे साहित्य घेऊन सीबीआयचे काही अधिकारी बुधवारी दिल्लीला रवाना झाले. या प्रकरणाचा तपास अतिशय गोपनीय पद्धतीने सुरू असून यात बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात सीबीआयचे जनसंपर्क अधिकारी सी.पी. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आरोपींना फायदा होऊ नये म्हणून गोपनीय पद्धतीने तपास सुरू आहे. तपास पूर्ण होताच योग्य ती माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात येईल.

गैरप्रकार देशभरात?  

असा प्रकार देशभरातील शिकवणी वर्गांकडून होत असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच सीबीआयकडून गोपनीयता बाळगण्यात येत असून उपराजधानीतील या दोन शिकवणी वर्गांसह देशातील इतर शिकवणी वर्ग आणि परीक्षा केंद्रांवरही कारवाई होण्याची शक्यता सीबीआयच्या विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admission to medical college neet exam dummy candidate conspiracy exposed akp
First published on: 16-09-2021 at 00:29 IST