वाडीतील दुहेरी खून प्रकरणाला वेगळी कलाटणी

खास प्रतिनिधी, नागपूर</strong>

दत्तक मुलीने प्रियकराला सोबत घेऊन आईवडिलांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपी मुलगी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका शंकर चंपाती (२३) रा. सुरक्षानगर, दत्तवाडी आणि मोहम्मद इकलाख खान (२३) रा. वडधामना अशी आरोपींची नावे आहेत. शंकर अतुलचंद्र चंपाती (७२) आणि सीमा शंकर चंपाती (६४) रा. सुरक्षानगर असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. शंकर चंपाती हे कोळसा खाणीत कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर ते नारळपाणी विकायचे.  निपुत्रिक असल्याने त्यांनी प्रियंकाला दत्तक घेतले होते. तिला स्वत:च्या मुलाप्रमाणे वाढवले. तिला अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. आता ती सध्या आयटी पार्कमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करीत आहे. तिच्या विवाहाची चिंता आईवडिलांना होती. दरम्यान, चार वर्षांपासून तिचे आरोपी अखलाख याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या आईवडिलांना मिळाली होती. शिवाय ती घरात राहताना अतिशय तोकडे कपडे घालायची. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहायची. त्यामुळे आईवडील तिला रागावत होते. प्रेमाच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या आईवडिलांचा काटा काढण्याची योजना आखली. रविवारी दुपारी त्यांनी संगनमत करून  त्यांची हत्या क ेली.  त्यानंतर दोघेही वेगवेगळया दिशेने निघून गेले. रात्री ती घरी परतली व पोलिसांना आईवडिलांच्या खुनाची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात तपास करून सहाय्यक निरीक्षक गोरख कुंभार यांनी आरोपींना अटक केली.

खरबूजमधून दिले गुंगीचे औषध

रविवारी कंपनीला सुटी असल्याने प्रियंका घरी होती. योजनेनुसार दुपारच्या सुमारास तिने आईवडिलांना खरबूज खायला दिले. त्यात गुंगीचे औषध मिळसले. आईवडील बेशुद्ध झाले. त्यानंतर प्रियकराला बोलावून घेतले व नारळ कापण्याच्या कोयत्याने त्यांना संपवले. त्यानंतर ती सीताबर्डी परिसरातील बिग बाजारमध्ये फिरायला गेली, तर प्रियकर दुसरीकडे निघून गेला.

मोबाईलचे लोकेशन बदलण्याचा प्रयत्न

प्रियंका ही संगणक अभियंता आहे. तिने पोलिसांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी व खुनाचा आळ दुसऱ्यावर यावा म्हणून स्वत:चे व प्रियकराच्या मोबाईलचे लोकेशन वाडी परिसरात येऊ नये, अशी व्यवस्था केली होती. त्यासाठी  तिने संगणक तंत्रज्ञानाचा वापर केला. पण, पोलिसांनी तिच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डचा (सीडीआर) अभ्यास करून दोघांनाही ताब्यात घेतले व कसून चौकशी केली. शेवटी प्रियकराने खुनाची माहिती दिली व भंडाफोड झाला.

आरोपी इकलाख उत्कृष्ट क्रिकेटपटू

इकलाख हा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे.तो  व्हीसीएकडून १६ व १९ वर्षांखालील क्रिकेट सामने खेळला आहे. तो रुबी क्लबचा सदस्य होता. काही दिवसांपूर्वी तो झिंबाब्वे येथे क्रिकेट खेळायला गेला होता. तेथून तो तीन आठवडय़ांपूर्वी परतला. त्यानंतर आपल्या प्रेयसीच्या मदतीने दुहेरी हत्याकांड केले.