नागपूर : एकेकाळी आरक्षणावरून आम्हाला सरकारी जावई म्हणून चिडवणारा मराठा समाज आज स्वत:च आरक्षण घेऊन सरकारी जावई झाला, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

अनुसूचित जाती, अनु. जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी कवी सुरेश भट सभागृहात शिष्यवृत्ती परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, १९७२, ७३, ७४ साली अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे मोर्चे निघायचे. तेव्हा मराठा समाजाचे लोक आम्हाला ‘सरकारी जावई’ असे चिडवायचे. पण, आता काळ बदलला. काळाने अशी परिस्थिती निर्माण केली की जे आम्हाला एकेकाळी  ‘सरकारी जावई’ म्हणायचे तेच ‘सरकारी जावई’ झाले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. सुरुवातीपासून मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आलो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

जातीवर आधारित आरक्षणाबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले, जोपर्यंत विषम व्यवस्था आहे, शिक्षणात विषमता आहे आणि जोपर्यंत सरकार शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत आरक्षणाशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्र सरकार देशातील सर्वात प्रतिगामी सरकार आहे. केंद्र सरकार शिष्यवृत्तीसाठी जेवढी रक्कम पाठवते, तेवढीची रक्कम वितरित केली जाते. राज्य सरकार त्या रकमेत भर घालत नाही. इतर राज्य सरकारे मात्र जेवढी रक्कम केंद्र सरकार पाठवते तेवढीच रक्कम स्वत:ही देतात.

ओबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. त्यांच्या शेकडो जागा रिक्त राहिल्या. या सरकारच्या काळात शिष्यवृत्ती मिळेल, याची खात्री नाही. आरक्षण, शिष्यवृत्ती हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपली सत्ता येणे आवश्यक आहे. त्यामुळे जाती निर्मूलन होत राहील, आधी व्यवस्था बदलण्याचे चक्र गतिमान करा. सत्ता मिळाल्याशिवाय कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला स्वरूप देता येणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष भूषण वाघमारे, आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलास उईके, विधि विभागाचे कैश तिरपुडे, समता सैनिक दलाच्या अ‍ॅड. स्मिता कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करताना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले.

१० ऑगस्टपर्यंत आघाडीचे चित्र स्पष्ट!

काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व वेगळे बोलते आणि राज्यातील नेतृत्व वेगळे बोलते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यातील नेतृत्व कुटुंबशाहीचे प्रतीक आहे. त्यांची आघाडी ही राजकीय आघाडी नसून कुटुंबशाहीची आघाडी आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला प्रस्तावाचे पत्र दिले. त्यावर आम्ही त्यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. १० ऑगस्टपर्यंत आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. १५ ऑगस्टपासून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे अ‍ॅड. आंबेडकर सांगितले.