गरीब रुग्णांसाठी २० टक्के खाटा राखीव;  शैलेश जोगळेकर आणि डॉ. आनंद पाठक यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

थायरॉईड कर्करुग्णासाठी  नवीन आयोडिन थेरपी वरदान असून राज्यात मुंबई वगळता इतरत्र ही उपचार पद्धत उपलब्ध नाही. मध्य भारतातील रुग्णांसाठी नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटमध्ये (एनसीआय) ही सोय  येत्या तीन महिन्यात ती सुरू होईल, येथे कर्ग रोगाच्या अचुक निदानासाठी मॉलिक्युलर प्रयोगशाळाही सुरू होत आहे, अशी माहिती नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटचे  शैलेश जोगळेकर आणि वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक यांनी दिली.

जोगळेकर व डॉ. पाठक यांनी गुरुवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. डॉ. आनंद पाठक म्हणाले की, नागपूरात विदर्भासह शेजारच्या चार राज्यातून रोज मोठय़ा संख्येने कॅन्सरग्रस्त उपचारासाठी येतात. यात थायरॉईड  कर्करुग्णांचा  समावेश असतो. या रुग्णांसाठी आयोडिन थेरपीची मदत होईल. त्यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयातील तज्ज्ञ उपलब्ध झाले असून येत्या तीन महिन्यात ही सुविधा उपलब्ध होईल. बाल कर्करुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या रुग्णांसाठी २० टक्के खाटा राखीव ठेवल्याचेही डॉ. पाठक म्हणाले.

शैलेश जोगळेकर म्हणाले की, सामाजिक उपक्रम म्हणून एनसीआय सुरू करण्यात आले आहे. येथे मुंबईच्या टाटा रुग्णालयात होतात त्याच धर्तीवर उपचार उपलब्ध आहे. येथे कॅन्सरग्रस्तांचे सीटी स्कॅन, एमआरआयसह सर्व तपासणीचे शुल्क बाजारभावाच्या तुलनेत २५ ते ३० टक्केच आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनातील रुग्णांसह परराज्यातील गरीब रुग्णांवर येथे मोफत उपचाराकरिता कॅन्सर केअर फंड उभारण्यात येत असून त्यातून रुग्णांवर उपचार केल्या जातात. दानदात्यांकडूनही गरीबांना उपचाराच्या शुल्कासाठी मदत मिळवून दिल्या जाते.

एनसीआयमध्ये कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न सुरू आहे.  रुग्णालयातील वातावरणही घरासारखे असेल, असे डॉ. आनंद पाठक म्हणाले. रुग्णांवर उपचाराचा कालावधी जास्त राहत असल्याने नातेवाईकांसाठी येथे राहण्याची निशुल्क सोय केली असून परिसरात ३५० नातेवाईक राहू शकतील अशी व्यवस्था (निवारा) केली जात आहे.  रुग्णालयात लवकरच बोन मॅरो पेशी प्रत्यारोपण युनिट, केमोथेरपी युनीट, रेडिओ थेरपी ट्रिटमेन्ट तसेच इतर अत्याधुनिक उपचारांची सुविधाही रुग्णालयात विकसीत केल्या जात असल्याचे जोगळेकर यांनी सांगितले.

दोन वर्षांत हाडांच्या कॅन्सरग्रस्तांवर शस्त्रक्रिया

सर्वत्र हाडांचे कर्करुग्ण आढळत असले तरी मुंबई वगळता इतरत्र या शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ व सोय नाही. एनसीआयमध्ये या विषयातील एक तज्ज्ञ नियुक्त करण्यात आला असून त्याला प्रशिक्षणासाठी मुंबईच्या टाटा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोन वर्षांनी या तज्ज्ञाच्या मदतीने नागपूरातही हाडांच्या कॅन्सरग्रस्तांवर शस्त्रक्रिया उपलब्ध होईल. ही शस्त्रक्रिया असलेली एनसीआय ही पहिली संस्थाराहणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

पदव्यूत्तर अभ्यासक्रम लवकरच

एनसीआयमध्ये कर्करोगाला हाताळणारे मनुष्यबळ वाढवण्यासाठी प्रशिक्षित परिचारिका, तंत्रज्ञांसह इतर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. सोबत दोन वर्षांत पदव्यूत्तरचेही बरेच अभ्यासक्रम येथे सुरू होईल.

चार महिन्यात ३,४०० रुग्णांची नोंद

एनसीआयमध्ये गेल्या चार महिन्यांत ३,४०० नवीन कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले असून १२ हजार रुग्णांनी तज्ज्ञांचा उपचारासाठी सल्ला घेतला आहे. सर्वाधिक रुग्ण मुख, अन्ननलिका, ब्रेस्ट कॅन्सरचे आहेत. येथे रोज १७५ ते २०० रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात उपचारासाठी येतात. कॅन्सरवर उपचार करणे एकाच तज्ज्ञाचे काम नसल्याने येथे विविध विभागाचे ४८ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती खूद्द टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली असून त्यांच्याकडून या डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.