वनभवनाच्या प्रवेशद्वारावरच सीसीटीव्हीचे जाहिरातसदृश्य सूचना फलक लावणाऱ्या वनखात्याला अखेर जाग आली आणि या जाहिरात फलकाची जागा आता व्याघ्र प्रकल्प, अभयारण्याच्या जाहिरातीने घेतली. वनखात्याच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील सूचना फलक चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, ‘लोकसत्ता’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर तो सूचना फलक काढून टाकण्यात आला.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेराचे महत्त्व कितीतरी पटीने अधिक आहे. कॅमेरा लावलेल्या ठिकाणी चोवीसही तास घडणाऱ्या घडामोडी त्यात कैद होण्यासोबतच, त्या पुरावा म्हणूनही उपयोगी ठरतात. मुळातच गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही लावले जात असेल, तर अशा सूचना लिहीण्याची गरज नाही. ही कृती म्हणजे चोराला सावधानतेचा इशारा देण्यासारखे आहे. वनखात्याने मात्र, त्यावरही मात केली आणि मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच जाहिरातसदृश्य भलामोठा सूचना फलक लावला. राज्याच्या वनखात्याचे मुख्यालय असल्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय याच इमारतीतून घेतले जातात. अनेक महत्त्वाच्या घडामोडी येथे घडतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तेवढीच खबरदारी घेतली जाणे अपेक्षित आहे. अनेक वर्षांनंतर का होईना वनखाते जागे झाले आणि अधिवेशनाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी चार सीसीटीव्ही कॅमेरे मुख्यालयाच्या परिसरात लावण्यात आले. वनखात्याची ही कृती प्रशंसनीय असली तरीही सीसीटीव्हीचा सूचना फलक तयार करून तो मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आल्याने ही कृती हास्यास्पद ठरली. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कार्यालय नामाच्या फलकाखालीच ‘सदर कार्यालय सीसीटीव्हीच्या देखरेखीत आहे’ अशा सूचना सीसीटीव्हीच्या चित्रासह भल्यामोठय़ा आकारात चितारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे हा सूचना फलक लावण्यापूर्वी वारली कलाकृतीने इमारतीच्या प्रवेशद्वाराची भिंत सुशोभित करण्यात आली होती. या फलकाने त्यावर शिंतोडे उडवण्याचे काम केले. मुख्यालयात प्रवेश करताना जंगलात प्रवेश करण्याचा आभास निर्माण होणे अपेक्षित आहे, पण येथे पाऊल ठेवल्याबरोबरच सावधानतेचा इशारा मिळावा, असा आभास होत होता. त्यामुळे अनेकांनी वनखात्याच्या या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदवल्या.