एअर फेस्टसाठी भारतीय हवाई दलातील सूर्यकिरण एअरोबॅटिक पथक बुधवारी नागपुरात दाखल झाले आणि आज प्राथमिक स्वरूपाचा सराव केला. सारंग या हेलिकॉप्टर पथकाचा ‘फूल ड्रेस’ सराव शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर रविवारी एअर शो सादर केला जाणार आहे. त्यासाठी वायुसेना नगरातील फुटबॉल मैदानावर निमंत्रितांची व्यवस्था केली जाणार आहे.

भारतीय हवाई दलाचा ८७ व्या वर्धापन दिन आणि अनुरक्षण कमानच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरात एअर फेस्ट आयोजित करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना हवाई दलात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आंदोलन करण्यात आले आहे.

या ‘एअर शो’मध्ये सारंग या हेलिकॉप्टर पथकाचे प्रदर्शन तसेच सूर्यकिरण या पथकाचे हॉक विमानद्वारे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. यासोबत सुखोई विमानाद्वारे सलामी सादर केली जाणार आहे. हवाई दलाच्या गरुड विशेष दलाचे जवान चित्तथरारक सादरीकरण करणार आहेत.

तसेच आकाशगंगा या पॅराशूट पथकाचे देखील सादरीकरण होईल. एवढेच नव्हेतर हेलिकॉप्टर आणि काही सशास्त्रे बघता येणार आहेत. वायुसेना नगरातील फुटबॉल मैदानावर युवकांनी हवाई दलातील संधीबाबत माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत.

वाडी प्रवेशद्वार, फुटाळा मैदानावरून बघण्याची संधी नागपूरकरांना वायुसेना नगराच्या वाडी प्रवेशद्वाराकडील भाग, फुटाळा तलावाकडील प्रवेशद्वार तसेच दाभा कडील मोकळ्या जागेतून एअर शो बघता येणार आहे. अमरावती रोडच्या बाजूने देखील ‘एअर शो’ बघता येईल. त्यासाठी अमरावती रोडची एका बाजूची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.