नागपूर : वनदेवीनगरच्या अस्थायी पुलावरून पडून १२ वर्षीय बालिका बुधवारी दुपारी पिवळी नदीत वाहून गेली होती. गुरुवारी शोधूनही तिचा पत्ता लागला नाही. चोवीस तासानंतर पाच किमी दूर भरतनगरातील पावनगावजवळ तिचा मृतदेह सापडला. तेव्हा कुटुंबातील सदस्यांसह अनेकांना अश्रू अनावर झाले. सालेहा मुस्काम सलीम अन्सारी असे या बालिकेचे नाव आहे.

घरासमोर खेळणाऱ्या या बालिकेचे पार्थिव बघायला मिळेल असे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सालेहाचे कुटुंब पिवळी नदी येथील संगमनगरच्या गल्ली क्रमांक ३ मध्ये राहते. ती बुधवारी दुपारी मोठी बहीण झारिया सोबत आई शफिर उन्नीसा यांना भेटण्यासाठी गेली होती. दोघी बहिणी वनदेवीनगर मुख्य पुलाला लागून असलेल्या लोखंडी पुलावरून जात असताना सालेहाचा पाय पुलावरून घसरला आणि ती पिवळी नदीत पडली. काही कळण्याच्या आत पाण्याच्या प्रवाहात ती वाहत गेली. गुरुवारी सकाळी अग्निशमन विभागाचे पथक तिच्या शोधात गुंतले. दरम्यान, दुपारी  घटनास्थळापासून ६ किमी दूर असलेल्या पवनगावजवळ गावातील एका व्यक्तीला मुलीचे शव दिसले. त्याने लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर मुलीचे नातेवाईक आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले. तेव्हा सालेहा नदीच्या गाळात अडकली होती. तिची ओळख पटताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. सालेहाच्या आई व बहिणींना सांभाळणे कठीण झाले होते.