उमरेड येथील निंदनीय घटना

उमेरड येथील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) कंपनीच्या एका खाण कार्यालयामधील कर्मचारी तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचे डोके ठेचण्यात आले. यात तिचा एक डोळा फुटला असून तिची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तिच्यावर उपराजधानीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक संतोष मंगेलाल माली (३८) व त्याचा सहकारी अमलेश कन्हय्याला चक्रवर्ती (१९) रा. देवास मध्य प्रदेश या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित २४ वर्षीय तरुणी ही आपल्या आईवडिलांसह उमरेड येथेच राहते. तिचा भाऊ भिलाई येथे नोकरी करतो. तिच्या वडिलांची हेवती परिसरात शेतजमीन होती. ती शेती वेकोलिने संपादित केली. त्या मोबदल्यात व पुनर्वसन नियमांतर्गत पीडित मुलीला वर्षभरापूर्वी वेकोलित नोकरी मिळाली. ती वेकोलिच्या गोकुल पिराया खाणीमध्ये वेट ब्रिजवर (वजनकाटा) काम करीत होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास ती कार्यालयातील स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी गेली होती. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करून डोक्यावर मोठय़ा दगडाने वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पीडित मुलगी स्वच्छतागृहातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास दुसरी महिला कर्मचारी स्वच्छतागृहात गेली असता तिला पीडित मुलगी दिसली. त्यानंतर ताबडतोब कर्मचाऱ्यांनी तिला वेकोलिच्या रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने तिला ताबडतोब उपराजधानीतील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले. दुपारी ३.३० वाजतापासून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

यावेळी ऑरेंज सिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी पीडितेचा एक डोळा निकामी झाल्याचे दिसत असून डोक्यावर गंभीर जखम आहे. त्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. दुसरीकडे उमरेड पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.