मातृप्रेमाची कसोटी घेणाऱ्या नागपुरातील खटल्याकडे लक्ष

देशात सहिष्णुता-असहिष्णुतेची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे नागपूर येथील एकाच मुलासाठी जन्मदात्री हिंदू आई आणि संगोपन करणारी सावत्र मुस्लीम आई यांचा मुलाचा ताबा घेण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. यातील आश्चर्य म्हणजे जन्मदात्रीकडे जाण्यास मुलानेच नकार देऊन संगोपन करणाऱ्या सावत्र आईकडेच राहण्याची भावना व्यक्त करून ममत्वालाच कौल दिला आहे.

येथील अरमान याचे एका सविता नावाच्या (नाव बदलले आहे) मुलीवर प्रेम जडले. पुढे ते विवाहबंधनात अडकले. यानंतर काही दिवसांनीच सविता पोलीस दलात नोकरीला लागली. अरमान आणि सविताच्या कुटुंबात नवीन पाहुणा (सुजान) आल्याने ते आनंदात होते. या आनंदात सहा वष्रे उलटली. दरम्यान, त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि २००९ साली ते विभक्त झाले. त्या वेळी सुजान पाच वर्षांचा होता. न्यायालयीन प्रक्रियेतून मुलाचा ताबा वडील अरमान यास मिळाला. घटस्फोटानंतर अरमानने यास्मिन (नाव बदलले आहे) या मुस्लीम महिलेशी लग्न केले. तिनेही अरमानच्या या मुलाला स्वत:च्या मुलाप्रमाणे जीव लावला. अरमानचा २०१० मध्ये आकस्मिक मृत्यू झाला.मात्र, सुजानचे वडील मरण पावल्यानंतर त्याची आई सविताचे मातृप्रेम जागे झाले. सुजान याचे पालनपोषण दुसरी आई यास्मिन मायेने करीत आहे. सविताने मुलाच्या ताब्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु मुलाची या जन्मदात्रीकडे जाण्याची तयार नसल्याने तिने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयासमक्ष दोन्ही मातृप्रेमाची परीक्षा झाली. मुलाचे संगोपन करणाऱ्या आईसोबत राहायचे असतानाही नैसर्गिक नियमाने जन्मदात्या आईला मुलाचा ताबा देण्यात यावा, असा निकाल २०१२ मध्ये न्यायालयाने दिला. या निकालाने संगोपन करणाऱ्या यास्मिनला जबर धक्का बसला. त्यामुळे तिने या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी प्रथम न्या. वासंती नाईक यांच्या खंडपीठासमक्ष झाली. उच्च न्यायालयाने यास्मिनला अंतरिम दिलासा दिला व प्रकरणाच्या अंतिम निकालापर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला.

मुलाची सावत्र आईला पसंती

या प्रकरणावर निकाल देण्यासाठी न्यायालयाने दोनदा सुजानचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो १२ वर्षांचा असून स्वत:चे बरे-वाईट समजू शकतो. उच्च न्यायालयाला दिलेल्या जबाबात त्याने सावत्र आईसोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.