ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फटका

नागपूर : अकरावी केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी शेवटच्या दिवशी ३१ ऑगस्टपर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या चारही शाखांमध्ये ५८ हजार ८७५ जागांमधून केवळ ११ हजार ७९२ जागांमध्ये प्रवेश घेण्यात आले. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर ४७ हजार ८३ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे निकाल वाढीनंतरही प्रवेशवाढीचे महाविद्यालयांचे स्वप्न भंगले आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तात्पुरती यादी २३ ऑगस्टला प्रकाशित करण्यात आली. यामध्ये २७ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, यातून केवळ १७ हजार ९४४ विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांच्या पर्याय निवडला होता. त्यानुसार २७ ते ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यात आला. त्यानंतरही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, महाविद्यालयाचा पर्याय निवडूनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. विशेष म्हणजे, सर्वाधिक प्रवेश असणाऱ्या विज्ञान शाखेमधीलही अनेक प्रवेश रिक्त आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रि येमुळे अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. शिकवणी वर्गही ग्रामीण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेशाचा सल्ला देतात. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे शहरी भागातील महाविद्यालयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

 

नामवंत महाविद्यालयांना पसंती

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी या काही नामवंत महाविद्यालयांनी प्रवेशाला पसंती दिली. यामुळे या महाविद्यालयांमध्ये पहिल्या फेरीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता आला. अन्य महाविद्यालयांमध्ये या खालोखाल टक्केवारीवर प्रवेश झाले आहेत.