मनोरुग्णालयातील उपचारानंतर मुलगा घरी पोहचला

नागपूर : पाच वर्षांपूर्वी बिहारहून रेल्वेने निघालेल्या १९ वर्षीय तरुणाचे धामनगावला  उतरल्यावर त्याचे मानसिक संतुलन बिघडले. तो स्वत:चे नाव व पत्ता विसरला. पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या मदतीने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर प्रशासनाने त्याच्या घराचा पत्ता शोधून काढला. मंगळवारी पाच वर्षांनी १९ मार्चला मनोरुग्णालयात त्याचे वडील रुग्णाला घ्यायला आले.

मुकेश (२४) रा. बिहार असे रुग्णाचे नाव आहे. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. रोजगार मिळवण्यासाठी त्याने वयाच्या १९ व्या वर्षी रेल्वेने मित्राच्या सल्ल्याने महाराष्ट्रात यायचे ठरवले. रेल्वे प्रवासादरम्यान बिहारी असण्यावरून इतर प्रवाशांसोबत त्याचा वाद झाला. मुकेशच्या मनात भीतीने घर केले. तो धामणगावात उतरला. दहशतीमुळे मानसिक संतुलन बिघडले. तो स्वत:चे नाव व पत्ता विसरसला. नागपूर रेल्वेस्थानकावर गोंधळ घालण्यासह प्रवाशांना त्रास देताना पोलिसांनी पकडले. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे पुढे आल्यावर न्यायालयाच्या मदतीने पोलिसांनी तला मनोरुग्णालयात दाखल केले.

मनोरुग्णालयात उपचार सुरू झाले. काही कालावधीनंतर रुग्णाच्या मनस्थितीत सकारात्मक बदल घडू लागले. समाज सेवा अधीक्षक केवळ शेंडे रुग्णाशी नित्यान संवाद साधत असतांना एकदा रुग्णाने बिहार शब्द उच्चारला. हळूहळू रुग्णासोबत मित्रत्वाचे संबंध स्थापित करत रुग्णाने फत्तेचक, सुभानपूर, जगदीशपूर अशी गावांची नावे घेतली. हे ऐकून शेंडे यांनी मुकेशच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. संबधित गावातील पोलीस ठाण्याला मुकेशचे छायाचित्र पाठवण्यात आले. पोलिसांनीही जुन्या तक्रारींवरून शोध सुरू केला. त्यात मुकेशच्या घरचा पत्ता सापडला. तातडीने मुकेशच्या वडिलांशी संपर्क साधला गेला. आपला मुलगा सुखरूप असल्याचे बघत मंगळवारी त्याचे वडील बिहार येथून नागपूरला आले. दोघांनी एकमेकांना बघताच घट्ट मिठी मारली. तब्बल पाच वर्षांनी दोघांची गळाभेट बघून येथील काहींचे डोळे पानावले. त्यानंतर मुकेशला नातेवाईक परत घेऊन गेले. मुकेशला परत पाठवण्यासाठी वैद्यकीय अधीक्षका डॉ. माधुरी थोरात, डॉ. प्रवीण नवखरे, डॉ. मधुमिता बहाले, डॉ. ज्योती गलाट, डॉ. अभिषेक मामर्डे, केवळ शेंडे, मीना चहांदे यांची भूमिका महत्त्वाची होती.