उमेशबाबू चौबेंच्या निधनाने समाजमन गहिवरले

देव-देवतांच्या नावावर एखाद्या भामटय़ाने गंडवले असेल.. नवऱ्याने अकारण घरातून हाकलून दिलेले असेल.. आयुष्यभराच्या कमाईने घेतलेल्या भूखंडावर कुण्या गुंडाने रात्रभरात आपला कब्जा केला असेल.. तर हे निराश जीव थेट गणेशपेठमधील डालडा फॅक्ट्रीच्या मागे एका घरात पोहोचायचे.. पलंगावर नुकताच डोळा लागलेल्या एका माणसाला हक्काने जागवायचे.. आपली फिर्याद मांडायचे.. आणि ती फिर्याद ऐकताच खुंटीवरचा पांढरा सदरा घालून तो माणूस तडक पोलीस ठाण्यात पोहोचायचा.. पोलीस ऐकत नसतील तर या वंचित, शोषितांच्या हक्कासाठी जनआंदोलन उभारायचा.. अन् त्यांना न्याय मिळवून द्यायचा. त्या माणसाचे नाव होते  उमेशबाबू चौबे. बुधवारी उमेशबाबूंनी हे जग सोडले आणि त्यांच्यासोबत  वंचित, शोषितांच्या जनआंदोलनाचा शहरातील एक प्रखर अध्यायही संपला.

उमेशबाबू उपाख्य बाबूजी म्हणजे सर्वसामान्य माणासांचा बुलंद आवाज होते. मध्यप्रदेशच्या हरदानगरमध्ये १७ एप्रिल १९३३ जन्मलेल्या उमेशबाबूंचे प्राथमिक शिक्षण आग्रा जिल्ह्य़ातील यमुना नदीच्या किनाऱ्यावरील वडिलोपार्जित गाव होलिपुरा येथे झाले. धार्मिक प्रवृत्तीच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले बाबूजी बालपणी आपल्या अवतिभोवती घडणारे स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव, अन्याय अत्याचाराच्या घटनांकडे मूकदर्शक राहून ते पहात होते. उच्च शिक्षणासाठी आग्रा येथून नागपूरला येत असताना त्यांनी मार्गातील एका स्टेशनवर हिंदू-मुस्लीम पाणी असे ऐकले. त्यांना आश्चर्य वाटले, वडील दयाशंकर चौबे यांना त्यांनी प्रश्न विचारला, कक्का पाण्यामध्ये हिंदू व मुसलमान कसे काय शिरले, तेव्हा त्यांनी काही बोलणे योग्य नव्हते, मात्र निसर्गातील पंचतत्त्वाकडे आपण जाती आणि धर्माच्या चष्यामातून पाहतो. हे त्यांनी मान्य केले. बालपणी घडलेली छोटीशी गोष्ट खरे तर तिथेच संपली, पण ती घटना उमेशबाबूंच्या मनात बिजारोपण करून गेली. १९४२ च्या क्रांतीनंतर नागपुरात पोहोचलेल्या उमेशबाबूंनी गुलामीविरुद्ध सुरू  असलेल्या संघर्षांला जवळून बघितले आणि ते शालेय शिक्षणाच्या काळात नागपुरातील क्रांतिकारक देशभक्तांकडे आकर्षित झाले. त्यांच्यातील देशभक्तीची भावना ही त्यांच्या काळातील मोठी देणं आहे. १९६०च्या सुमारास यवतमाळ येथे एका कार्यक्रमासाठी समाजवादी चिंतक आणि देशभक्त डॉ. राममनोहर लोहिया आले होते. तिथे जाण्यापूर्वी ते व्हेरायटी चौकातील एका हॉटेलमध्ये त्यांची व बाबूजींची भेट झाली. पुढे ते लोहियांच्या समाजवादी आंदोलनाशी जुळले. लोहियाप्रती ते इतके आकिर्षत झाले की समाजवादी परिवारात एक राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. तत्कालीन सर्वच राजकीय नेत्यांशी त्यांची जवळीक होती. मात्र, जॉर्ज फर्नाडिस यांच्या ते अधिक जवळ होते.त्यांच्यामुळे नागपुरात शोषण मुक्तीच्या रूपात ट्रेड युनियनचे काम वर्षांनुवर्षे करत राहिले आणि त्यानंतर सर्वच असंघटित कामगार संघटनांशी जुळले आणि त्यांच्या हक्कासाठी ते आयुष्यभर लढले.  नागपूरला हातमाग विणकराच्या मागण्याच्या समर्थनार्थ त्यांनी उपोषण केले होते. तेजसिंगराव भोसले नागपूरचे महापौर असताना प्रत्येक सभेत भ्रष्टाचाराची प्रकरणे सभागृहात लावून धरत होते. त्यावेळी त्यांना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. सभागृहात त्यांनी सहा दिवस उपोषण केले होते मात्र, त्यावेळी अन्य सदस्यांच्या मध्यस्थीने निलंबनाचा आदेश महापौरांनी मागे घेतला होता. १९८२ मध्ये प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वात अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झाल्यांनतर या संस्थेशी ते जुळले. त्यापूर्वी नागपुरात एक पाखंड पोलखोल पंचायत नावाची संस्था स्थापन केली होती. पत्रकारिता करताना बाबूजींनी आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण आणि अविस्मरणीय काम केले आहे. नागपूरला उभे असलेले पत्रकार भवन ही बाबूजींची देण आहे.