प्रतिबंधांमुळे हाल होत असल्याने शेकडो लोक रस्त्यावर; रुग्ण नसतानाही कोंडून ठेवल्याने असंतोष उफाळला

नागपूर : करोनामुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र उघडण्याबाबतचे निकष मनमानी पद्धतीने बदलले जात असल्याने संतापलेल्या पार्वती नगरवासीयांचा संयम आज मंगळवारी अखेर संपला. एकही रुग्ण नसताना आणि सर्व संशयित घरी परतल्यावरही अकारण कोंडून ठेवल्याने संतापलेले नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले व त्यांनी महापालिका प्रशासन व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दंडुकेशाहीचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली

रामनगर हिल टॉप परिसरात आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात सलग दोन दिवस आंदोलन करण्यात आले. मात्र महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंध हटवण्याबाबत कुठलाच निर्णय घेतला गेला नसतानाच आज मंगळवारी पार्वतीनगरातही आंदोलनाचा भडका उडाला. ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे पाटील यांच्या नेतृत्वात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पार्वतीनगरात ५ मे रोजी एक करोनाबाधित युवक दगावला व तीन नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर हा परिसर बंद करून चारशेपेक्षा जास्त लोकांना विलगीकरणासाठी नेण्यात आले होते. यातील रुग्ण बरे होऊन व अहवाल नकारात्मक आल्याने संशयितही घरी परतले आहेत. तरीही या परिसरातील निर्बंध हटवण्यात आले नाही.  आयुक्तांच्या मनमानी कारभारामुळे आमच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. आजारी लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी अडचणी येत आहेत, असा आरोप करीत नागरिकांनी हे आंदोलन केले. हनुमानगरच्या सहायक आयुक्त व अन्य अधिकारी आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी नागरिकांशी चर्चा केली.

पोलीस आहेत की हिटलर?

आरोग्याचे कारण सांगूनही पोलीस बाहेर जाण्यास मज्जाव करतात. खूपच आग्रह धरला तर लाठी उगारतात. हे पोलीस आहेत की हिटलर, असा सवाल या परिसरातील एका तरुणीने उपस्थित केला. पोटाचा त्रास असह्य़ झाल्याने मी डॉक्टरकडे जाण्याची विनंती केली परंतु पोलिसांनी मला अर्ध्या रस्त्यातून परत पाठवले. तुम्हाला बाहेर सोडले तर महापालिका आयुक्त आमची नोकरी खातील. थोडा त्रास असेल तर घरीच सहन करा. प्रकृती गंभीर झालीच तर रुग्णवाहिका बोलावू, असा अजब पर्याय पोलिसांनी सांगितल्याचा आरोप या तरुणीने केला.

.. तर आम्ही भूकबळी ठरू!

आज २० दिवस झाले मजुरीसाठी घराबाहेर पडलो नाही. जे थोडे पैसे संग्रही होते ते संपले. पत्नी, मुले अर्धपोटी झोपताहेत. आमची ही वेदना ऐकायलाही कुणी नाही. प्रशासन म्हणतेय त्याप्रमाणे आणखी काही दिवस आमचा परिसर प्रतिबंधित ठेवला तर आमचा भुकेने बळी जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. प्रशासनाला कठोर प्रतिबंध घालायचेच असतील तर अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू मोफत द्या. आम्ही आयुष्यभर बंदिस्त राहायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया या आंदोलनात सहभागी मजुरांनी व्यक्त केली.

आयुक्तांच्या मनमानी कारभारामुळे एकही करोनाबाधित नसलेल्या लोकांना वेठीस धरले जात आहे. एकही रुग्ण नसताना किती दिवस परिसर बंद ठेवला जाईल, याबाबत नागरिकांशी संवाद साधला पाहिजे मात्र आयुक्त मनमानी पद्धतीने वागत लोकांना त्रास देत आहेत.

– प्रफुल गुडधे,  नगरसेवक.