केंद्राच्या धोरणाविरुद्ध कामगार, कर्मचारी रस्त्यावर; वाढीव वीज देयकांविरुद्ध मनसे, विदर्भवाद्यांचा मोर्चा

नागपूर : संप, मोर्चा, आंदोलनांनी गुरुवार दिवसभर गाजत राहिला. देशातील प्रमुख दहा कामगार संघटनांनी केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक संपाला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या कामगार व कृषी धोरणाविरुद्ध पुकारलेल्या या संपात बँंका, विमा, आरोग्य, राज्य व केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनांसह इतरही संघटनांनी भाग घेतला. याशिवाय वाढीव वीज देयकांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विदर्भवाद्यांनीही मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

केंद्र सरकारविरुद्धच्या आंदोलनात सरकारी कार्यालये, केंद्रीय कार्यालये, बँक, कोळसा, वीज, संरक्षण विभाग व आशा कर्मचारी  सहभागी झाले होते. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्समधील संघटनांनीही मोर्चा काढून कामगार धोरणाचा निषेध केला.  ग्रामीणमध्ये पारशिवनी, देवलापार, पवनी, रामटेक, मोहगाव आदी ठिकाणी शेतकरी, कामगारांनी संपात भाग घेतला. संविधान चौकात आयटक, वीज वर्कर्स फेडरेशन, शालेय पोषण आहार, बांधकाम कामगार, कंत्राटी कामगारांनी धरणे देऊन कामगार, शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी केली. आयटकचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे, मारोती वानखेडे व इतर नेते यावेळी उपस्थित होते.

बँक, विमा कर्मचारीही संपात सहभागी

राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर कामबंद आंदोलन करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सर्वसाधरण विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीही कार्यालयाबाहेर  निदर्शने केर्ली. ंकग्सवे मार्गावरील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ईएमबीईएचे अध्यक्ष कॉम. सुरेश बोभाटे व महासचिव कॉम. जयंत गुर्वे, कॉम. चेंदिल अय्यर, कॉ. अशोक एटकरे आदींनी सरकारच्या  विरोधात नारेबाजी केली. कार्यक्रमाचे संचालन जयंत गुर्वे यांनी केले. बँका बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प पडली. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही बंदात सहभागी होत संविधान चौकात निदर्शने केली. यावेळी सर्वसाधारण विमा कर्मचारी युनियन वेस्ट झोनचे विभागीय सचिव कॉम. विनय कापसे यांच्या नेतृत्वात सहसचिव कॉम. प्रशांत दीक्षित, कॉम. दीपक गोतमारे, जगदीश वारंभे, श्याम भालेराव आदी उपस्थित होते.

कार्यालयात शुकशुकाट

कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयात  शुकशुकाट  होता. अनेक विभागात अधिकाऱ्यांना स्वत: उठून फाईल्स आणाव्या लागल्या. कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयापुढे निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जिल्ह्यात संप १०० टक्केयशस्वी झाल्याचा दावा केला. जिल्ह्यात महसूल,. जि.प. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपावर होते. कर्मचारी विरोधी धोरणाचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक दगडे व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले यांनी केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध केला.

मेडिकल- मेयोत  निदर्शने

मेडिकल, मेया या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात  निदर्शने केली. यावेळी रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली. अनेक परिचारिकांनीही  हजेरीपटावर सही न करता रुग्णसेवा देत आंदोलनाला समर्थन दिले. मेयोच्या आंदोलनात

विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (इंटक)चे त्रिशरण सहारे यांच्यासह इतरही पदाधिकारी सहभागी झाले होत, तर मेडिकलमध्येही काही कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. इंटककडून संप यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला.

विमा सेवा विस्कळीत

देशव्यापी संपात भारतीय आयुर्विमा महामंडळातील कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन संप यशस्वी केल्याचा दावा अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशन पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अनिल ढोकपांडे यांनी केला. आयुर्विमा मुख्यालयासमोर आज कर्मचाऱ्यांनी  केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. द्वारसभेत अनिल ढोकपांडे, रमेश पाटणे, टी.के. चक्रवर्ती, नेहा मोटे यांची भाषणे झाली. अध्यक्षस्थानी नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनच्या अध्यक्षा नेहा मोटे होत्या.

सात टक्केच वीज कर्मचारी संपावर

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या आवाहनानंतरही महावितरणच्या केवळ ७ ते ८ टक्केच कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. काही कर्मचारी हजेरी लावून निदर्शनात सहभागी झाले. परंतु फेडरेशनकडून कडेकोट संप झाल्याचा दावा करण्यात आला. महावितरणच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १२ ते सकाळी ८ पर्यंतच्या पाळीत २८९ पैकी २५२ कर्मचारी हजर  तर केवळ ३५ कर्मचारी संपावर होते. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंतच्या पाळीत १,८२१ कर्मचाऱ्यांपैकी १,५४० कर्मचारी हजर तर केवळ १६९ कर्मचारी संपावर होते. दुपारी ४ ते रात्री १२ वाजतापर्यंत ३२८ कर्मचाऱ्यांपैकी २७८ कर्मचारी हजर तर केवळ २८ कर्मचारी गैरहजर होते.

आरटीओ कार्यालयातील काम प्रभावित

आरटीओ कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने  शहर व पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातील काम प्रभावित झाले होते. त्यानुसार बऱ्याच नागरिकांना पैसे भरण्यासह इतर कामात समस्या उद्भवल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागले.