News Flash

मेडिकलकडून ‘एम्स’च्या प्रस्तावाला केराची टोपली!

‘क्ष- किरणशास्त्र’च्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष

‘क्ष- किरणशास्त्र’च्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : मेडिकल रुग्णालयात एमआरआय यंत्र नाही, पण क्ष-किरणशास्त्र विभागाचे सुमारे ४० पदव्युत्तर डॉक्टर आहेत तर तिकडे एम्स रुग्णालयात एमआरआय यंत्र आहे, परंतु पदव्युत्तरचे डॉक्टर नाहीत. त्यामुळे मेडिकलमधील या विद्यार्थ्यांना एमआरआय यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण मिळण्यात तर एम्सला जास्त रुग्णांची एमआरआय तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे एम्सने मेडिकलला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार,

क्ष-किरणशास्त्रचे पदव्युत्तर विद्यार्थी एम्सला दिल्यास त्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवली होती. परंतु मेडिकलने या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याने मेडिकलच्या विद्यार्थ्यांसह एम्सच्या रुग्णांनाही फटका सहन करावा लागत आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एमएमसी)च्या निकषानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय यंत्र असणे आवश्यक आहे. क्ष- किरणशास्त्र विभागाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयात तर ते आवश्यकच आहे. काही वर्षांपूर्वी  मेयोमध्ये एमआरआय यंत्र नव्हते. त्यामुळे तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रम अडचणीत येत होता. येथील विद्यार्थी एमआरआय प्रशिक्षणासाठी मेडिकलला पाठवले जात होते. परंतु आता मेयोत नवीन एमआरआय यंत्र उपलब्ध आहे. मेडिकलचे कालबाह्य़ एमआरआय यंत्र बंद पडल्याने तेथे तपासणी होत नाही. मेडिकलचे यंत्र बंद होऊन बरीच वर्षे झाल्यावरही येथे नवीन यंत्र मिळाले नाही. त्यामुळे मेडिकलच्या प्रत्येक वर्षी प्रवेश घेणाऱ्या १७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना  व तीन वर्षांच्या सुमारे ४० पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एमआरआय प्रशिक्षण मिळण्यात अडचणी येत आहेत.

मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरती सोय म्हणून मेयो प्रशासनाशी करार करत तेथे आलटून-पालटून मेडिकलच्या पदव्युत्तर डॉक्टरांच्या सेवा लावल्या जात आहेत. तेथे काही प्रमाणात या डॉक्टरांना एमआरआयचे प्रशिक्षण मिळते. दरम्यान, एम्समध्येही नवीन एमआरआय यंत्र आले आहे. परंतु तेथे अद्याप पदव्युत्तरचे अभ्यासक्रम नसल्याने पदव्युत्तर डॉक्टर व एमआरआय यंत्र चालवण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांबाबत मर्यादा आहेत. त्यामुळे क्षमतेच्या तुलनेत कमी रुग्णांच्या  तपासण्या होतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी एम्स प्रशासनाने मेडिकलच्या क्ष- किरणशास्त्र विभागाकडे त्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एम्समध्ये  प्रशिक्षणाची तयारी दाखवली होती. परंतु ९ जुलैला पाठवलेल्या प्रस्तावावर अद्यापही एम्सला उत्तर न मिळाल्याने मेडिकलने या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे.

निविदा प्रक्रिया सुरू

मेडिकलच्या एमआरआय यंत्र खरेदीसाठी निविदा प्रक्रिया झाली आहे. त्यानंतर विविध प्रकारच्या तांत्रिक व इतर प्रकारच्या तपासणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर मेडिकलला हे यंत्र उपलब्ध होईल. एम्सकडून प्रशिक्षणाचा प्रस्ताव आला आहे. तो नियमानुसार अधिष्ठाता कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. परंतु  अद्याप उत्तर मिळाले नसल्याने त्यावर काही बोलता येत नाही.’’

– प्रा. डॉ. आरती आनंद, विभागप्रमुख, क्ष- किरणशास्त्र विभाग, मेडिकल.

एम्ससोबत झालेल्या कराराचाही विसर

नागपुरात आवश्यक वास्तू नसतानाही एम्सचे शैक्षणिक सत्र मेडिकल परिसरात सुरू करण्यासाठी  राज्य व केंद्र सरकारमध्ये करार झाला होता. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्य शासनाच्या वतीने एम्सला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे डॉक्टर उपलब्ध केले जात नसल्याने या कराराचा मेडिकल प्रशासनाला विसर पडला काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रस्तावानुसार मेडिकलच्याच विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:19 am

Web Title: aiims hospital has mri machine but no postgraduate doctors zws 70
Next Stories
1 पद टिकवण्यासाठी सरपंचाचा अफलातून आटापिटा
2 आंतरजातीय विवाहावर टिपणी केल्याने खून
3 करोनेतर रुग्ण ४० टक्क्यांनी वाढले!
Just Now!
X