News Flash

प्रतिबंधित क्षेत्रात तीनदा सर्वेक्षणाची सूचना

करोना उपचार व्यवस्थेची ‘एम्स’कडून पाहणी

करोना उपचार व्यवस्थेची ‘एम्स’कडून पाहणी

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदेशावरून नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) तज्ज्ञांच्या चमूने नागपूर जिल्ह्य़ातील करोना उपचार व्यवस्थेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. त्यात सतरंजीपुरा परिसरातील विलगीकरण प्रक्रियेसह इतर व्यवस्थेचे कौतुक करत शहरातील करोना प्रतिबंधित क्षेत्रात विषाणू नियंत्रणासाठी १४ दिवसांमध्ये तीनदा सर्वेक्षण करण्याची सूचना केली आहे.

सतरंजीपुरात वाढते रुग्ण बघता प्रशासनाने वेळीच मोठय़ा संख्येने नागरिकांचे विलगीकरण केल्यावर त्यातील अनेकांना विषाणूची बाधा असल्याचे पुढे आले. या भागात फिवर क्लिनिक कायम सुरू ठेवावे, प्रतिबंधित क्षेत्रात सध्या एकदा होणारे सर्वेक्षण वाढवून पुढे रुग्ण आढळताच चार दिवसांच्या आत एकदा, ७ ते ८ दिवसांत दुसऱ्यांदा आणि १३ ते १४ दिवसांत तिसऱ्यांदा सर्वेक्षण करून लक्षणे असलेल्यांना तातडीने शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची सूचना केली. या भागात नागरिकांकडून संपर्कातील व्यक्तींची माहिती दिली जात नसल्याने विलगीकरण प्रभावी ठरल्याचाही अनुभव समितीला आला.

राज्याचे करोनाबाबतचे स्थानिक नियोजन, करोनाचे रुग्ण आढळणाऱ्या भागातील प्रत्यक्ष व्यवस्था आणि बाधित रुग्णांच्या उपचार व्यवस्थेची पाहणी करून त्यात सुधारणा सुचवणे हा या निरीक्षणाचा हेतू होता. त्यासाठी एम्सच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी.पी. जोशी आणि रोग प्रतिबंधकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप देशमुख यांच्यावर जबाबदारी होती. दोन सदस्यीय चमूने नागपुरातील सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या सतरंजीपुरा, मोमीनपुरा या प्रतिबंधित क्षेत्राला भेट देत येथील पाहणी केली.

करोनामुक्त झालेल्यांची मदत घ्या

करोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये या विषाणूशी लढण्याची प्रतिकारशक्ती विकसित होते. त्यामुळे त्यांना इतरांच्या तुलनेत पुन्हा बाधा होण्याची शक्यता कमी होते. या व्यक्तीला करोना योद्धा करून  आजार नियंत्रणासाठी त्याची मदत घ्यावी, असे समितीने सूचवले. गृहविलगीकरणातील व्यक्ती विलगीकरणाचे नियम पाळत नसल्याचेही अनेक प्रकार समितीच्या निदर्शनास आले.

विलगीकरण केंद्रात  तपासणी साधन हवे

आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात  प्रत्येक व्यक्तीला तपासण्यासाठी आवश्यक  साधनांसह  रक्ताचे प्रमाण बघणारी ‘पल्स ऑक्सिमीटर’ची गरज समितीने विशद केली. येथे रक्तदाब, मधुमेहासह अत्यवस्थ  रुग्णासाठी  औषधांची उपलब्धता आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:26 am

Web Title: aiims inspection of corona treatment system zws 70
Next Stories
1 भोजन कंत्राट वाटपात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप?
2 ‘विलगीकरण केंद्रांमध्ये स्वच्छतेसह मूलभूत सुविधा द्या’
3 अंबाझरी जैवविविधता उद्यानाला आग
Just Now!
X