प्रकल्पावर पैशांची उधळपट्टी

नागपूर : उपराजधानीतील दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय अद्याप पूर्णत्वास जायचे आहे. मात्र, या प्रकल्पावर पैशाची वारेमाप उधळपट्टी केली जात आहे. निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्यासाठी गोरेवाडा प्रशासनाने आता जंगलात काम करण्यासाठी चक्क १६ लाख ९६ हजार ४६१ रुपये खर्च करून वाताानुकूलित ट्रॅक्टर खरेदी केले आहे.

शहरातील प्रदूषणाला कंटाळलेल्या नागरिकांसाठी गोरेवाडय़ाचे जंगल एक वरदान ठरत आहे. नागरिकांना येथील शुद्ध हवेत श्वास घेता यावा म्हणून गोरेवाडा प्रशासनाने त्यांना येथील निसर्ग पायवाट मोकळी करून दिली आहे. नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत असताना प्रशासनाची कृती मात्र या विरोधात जाणारी आहे. गोरेवाडा प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी जंगलात मोठय़ा प्रमाणावर कामे सुरू आहेत. त्याकरिता वाहनांची गरज आहे, पण त्यासाठी चक्क वाताानुकूलित  वाहने खरेदी केली जात आहे. सामानाच्या वाहतुकीसाठी, पाण्याचे टँकर वाहून नेण्यासाठी आणि इतर कामांसाठी त्यांनी जॉन डिअर कंपनीचे ७५ हॉर्सपॉवरचे ‘५०७५ई’ या मॉडेलचे वाताानुकूलित ट्रॅक्टर खरेदी केले.

यासंदर्भात जॉन डिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील कार्यालयाकडून १३ डिसेंबर २०१७ ला  कोटेशन मागवण्यात आले. त्यानंतर ३१ मार्च २०१८ ला  खरेदीसाठी परवानगी पत्र काढले. ट्रॅक्टर खरेदीचा ऑर्डर देतानाच पाच लाख रुपये ऑनलाईन चुकते करण्यात आले, तर उर्वरित ११ लाख ९६ हजार ४६१ रुपये देखील त्यानंतर चुकते करण्यात येईल, असे कंपनीला सूचित करण्यात आले. जंगलातील कामांसाठी ट्रॅक्टरची गरज आहे. पण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी वातानुकूलित ट्रॅक्टरची गरज हे प्रशासनाचे म्हणणे न उलगडणारे आहे. काचेचे कॅबिन असल्यामुळे जंगलात झाडांच्या फांद्या लागून ते फुटण्याची शक्यता आहे. अशावेळी पुन्हा त्यावर खर्च करण्याची वेळ देखील प्रशासनावर येऊ शकते. एवढय़ा खर्चात दोन ट्रॅक्टर खरेदी करता येऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे.

वाताानुकूलित ट्रॅक्टर म्हणून नाही तर या ट्रॅक्टरचे अनेक उपयोग आहेत. जंगलात काम करताना वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी ट्रॅक्टरला कॅबिन आवश्यक आहे. अलीकडे सर्वच वाहनांना एसी असतात. उन्हापासून संरक्षणासाठी वाताानुकूलित ट्रॅक्टर घेतले. हा निर्णय आताचा नाही तर तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांच्या काळातला आहे. ट्रॅक्टरचे कार्य प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतरच त्याची उपयोगिता कळेल.

– नंदकिशोर काळे,

विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा