22 April 2019

News Flash

तंबाखूपेक्षा हवेतील प्रदूषण जास्त घातक

२०१७ मध्ये हवेच्या प्रदूषणामुळे सुमारे १७.४ लाख लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती या अहवालात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा निष्कर्ष

नागपूर :  तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारखे आजार होतात, पण त्याहीपेक्षा हवेचे प्रदूषण लोकांच्या आरोग्यासाठी अधिक घातक ठरत आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांपेक्षा हवेच्या प्रदूषणामुळे आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नव्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

श्वासोच्छ्वास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. वैद्यकीय भाषेत माणसाच्या जिवंतपणाचे ते लक्षण आहे. या श्वासोच्छ्वासातून वातावरणातील प्रदूषणाचे कण आपोआप शरीरात जातात आणि त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या आयसीएमआरने केलेल्या नव्या संशोधनातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. देशातील सुमारे ७७ टक्केनागरिक हवेच्या प्रदूषणामुळे विविध आजारांना बळी पडत आहेत. परिणामी, त्यांचे आयुर्मान कमी होत आहे. प्रदूषणाच्या या जोखडातून मुक्त होऊन स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळाली तर प्रत्येक नागरिकांचे आयुर्मान किमान सात महिन्यांनी वाढू शकते. २०१७ मध्ये हवेच्या प्रदूषणामुळे सुमारे १७.४ लाख लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती या अहवालात आहे. तंबाखुमुळे देशात दरवर्षी एक लाख नागरिकांपैकी ६२ जण मृत्युमुखी पडत असतील, तर हवेच्या प्रदूषणामुळे ४९ जण मृत्युमुखी पडतात. प्रदूषित हवेमुळे कमी श्वसन संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. हे हवेतील प्रदूषण गर्भपातासाठी देखील कारणीभूत ठरत आहे. हवेतील अतिसूक्ष्म कण, नायट्रोजन ऑक्साईड आणि ओझोनचे प्रमाण वाढल्यानंतर तीन ते सात दिवसात गर्भपाताचा धोका संभवतो, हे देखील या अभ्यासात आहे.

धक्कादायक आकडेवारी

एक लाख लोकांमध्ये तंबाखूमुळे १९४ लोकांना कमी श्वसन संक्रमण होत असेल, तर हवा प्रदूषणामुळे ते ८२१ लोकांना होते. तंबाखूमुळे ५८७ लोकांना हृदयरोग होत असेल तर हवा प्रदूषणामुळे तो ६६७ लोकांना होतो. तंबाखूमुळे ९५ लोकांना मधुमेह होत असेल तर हवा प्रदूषणामुळे ते १९४ लोकांना होते. तंबाखूमुळे १० लोकांना मोतीबिंदू होत असेल तर हवा प्रदूषणामुळे ४३ लोकांना ते होते.

नागरिकांना जागृत व्हावे लागेल

प्रदूषणासाठी जे घटक कारणीभूत आहेत, ते कमी करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहे. त्यामुळे दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. यासाठी नागरिकांना जागृत व्हावे लागेल. आधी प्रदूषण कमी करा, नंतरच मते मिळतील, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली तर राजकीय प्रयत्नातून ही समस्या सुटण्यास मोठी मदत होईल.

– सुनील दहिया, ग्रीन पीस, नवी दिल्ली

First Published on February 13, 2019 1:31 am

Web Title: air pollution is more dangerous than tobacco