राजेश्वर ठाकरे

टाळेबंदी आणि त्यानंतर प्रवाशांची संख्या घटल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या नागरी विमान वाहतूक कंपन्यांना प्रवास भाडय़ातूनच प्रवाशांना सेफ्टी किट आणि पीपीई संच उपलब्ध करावे लागत आहेत. परिणामी, त्यांच्यावरील आर्थिक बोजा आणखी वाढला आहे.

पीपीई आणि सेफ्टी किटसाठी एका उड्डाणमागे सुमारे २२ हजारांहून अधिक खर्च सोसावा लागत आहे.

सध्या मुंबई विमानतळावर दररोज १०० येणाऱ्या आणि तेवढय़ाच जाणाऱ्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. नागपूर विमानतळावर सहा विमाने येतात आणि सहा जातात. यामध्ये सर्वाधिक उड्डाण खासगी कंपन्यांचे आहेत. यात इंडिगो आणि गो एअरचा समावेश आहे. पीपीई संच आणि सेफ्टी किटसाठी प्रति उड्डाण २५ हजार ५०० रुपयांचा अंदाजित खर्च गृहीत धरल्यास केवळ मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या आणि तिथून उडणाऱ्या २०० उड्डाणांसाठी सुमारे ५१ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च विमान कंपन्यांना सोसावा लागत आहे.  सुरत येथील आदित्य फॅशन या पीपीई संच निर्मात्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, ७० जीसीएमच्या एका संचाची किंमत १२५ रुपये तर ९० जीसीएमच्या एका संचाची किंमत १३५ रुपये आहे.  सेफ्टी किटमध्ये मुखपट्टी, फेस शिल्ड, हँड सॅनिटायजरचा समावेश आहे. ती  ७५ रुपयाला पडते. पूर्ण क्षमतेने प्रवासी असल्यास २१ हजार ६०० रुपये प्रति उड्डाणाचा खर्च  विमान कंपनीला येत आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्यानिर्देशानुसार  इंडिगोच्या प्रत्येक प्रवाशाला सेफ्टी किट व मधल्या आसनावरील प्रवाशाला पीपीई संच दिला जातो. एक पीपीई आणि सेफ्टी किटसाठी सुमारे २०० ते २५० रुपये खर्च येतो.

– सी. लिखा,  संचालक कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड ब्रॅन्ड रेप्युटेशन, इंडिगो एअर लाईन्स.