राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस  तथाकथित हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत जाऊ  शकते, तर भाजपसोबत का नाही? राज्यात निवडणुका होऊन एक महिना झाला आहे. त्यामुळे कोणीही सत्ता स्थापन करावी, पण लवकर करावी. अजित पवार यांच्यावर केवळ आरोपच लागले आहेत, खटला सुरू आहे का? शिक्षा झाली आहे का? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व विचारवंत मा.गो. वैद्य यांनी केला.

राज्यात देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतली. त्यावर बोलताना मा.गो. वैद्य म्हणाले, आता सगळे जुने समीकरण विसरून जा. २०१४ मध्ये भाजप सेनेची कुठे युती होती, तरीही पाच वर्षे सरकार चाललेच ना? तेव्हा सुद्धा  राष्ट्रवादीने भाजपला पाठिंब्याचे संकेत दिलेच होते. त्यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ  शकते. शिवसेना महाआघाडीत जाऊ  शकते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ  पाहतात, तेव्हा मतदार काय करू शकतात, याकडेही वैद्य यांनी लक्ष वेधले.