जड वाहतूक तातडीने बंद,  खड्डे पडलेल्या पदपथावरही कठडे

दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपूरला जोडणारा  ९२ वर्षांचा अजनी रेल्वेच्या पुलाचा काही भाग खचण्यास सुरुवात झाल्याने पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिवाय खड्डे पडलेल्या पदपथावरही कठडे लावण्यात आले आहे. तरीही जड वाहतूक सुरू असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी संयुक्त पाहणीनंतर समितीने हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता.

अजनी रेल्वे पूल १९२७ मध्ये (रेल्वेच्या नोंदीनुसार ) बांधण्यात आला होता. या पुलामुळे अजनी रेल्वे कर्मचारी वसाहत मार्गे दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपूरला जोडले जाते. अत्यंत व्यस्त असलेल्या या पुलाची माती रेल्वे रुळावर पडत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी व्हीएनआयटी या त्रयस्थ संस्थेकडून पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यात आली. समितीने पुलाचा काही भाग कमकुवत झाल्याचा निष्कर्ष काढला असून पूल दीर्घकाळ टिकवण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याची शिफारस केली. त्यानुसार रेल्वेने कमकुवत झालेल्या आणि खड्डे पडलेल्या भागाचा वापर होऊ नये म्हणून कठडे लावले आहे. जड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही जड वाहतूक होत असल्याचे दिसत आहे.

महापालिकेने ऑगस्ट २०१६ मध्ये या पुलाची पाहणी केली होती. त्यावेळी पूल नव्याने बांधण्याची शिफारस करण्यात आली होती. रेल्वेने त्यांच्या संरचनात्मक तपासणीच्या हवाला देत नवीन पूल उभारण्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर अजनी इंटर मॉडेल स्टेशन विकसित करतानाच या पुलाचे रूपांतर आठ पदरी पुलात करण्याची योजना आहे. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून डागडूजी केली जात आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता आणि बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी सांगितले. आठ पदरी पुलाचे संकल्प चित्र रेल्वेचे मुख्य अभियंता (मुंबई) यांच्या समक्ष सादर करण्यात आले, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक अभिजित जिचकार म्हणाले.डागडूजी सुरू आहे

अजनी रेल्वे पुलाची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे रेल्वेने कळवले होते. त्यानुसार महापालिका डागडूजी करीत आहे. पुलाचा वरील भाग दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे, तर खालच्या भागाची देखभाल दुरुस्ती रेल्वे करीत असते. – उल्हास देबडवार, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

रेल्वे रुळावर माती पडत असल्याने महापालिकेला पुलाची दुरुस्ती करण्यास आणि या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याची सूचना नागपूर पोलिसांना केली आहे.– एस.जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.