वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन संस्थेचा लेखाजोखा सादर न करताच संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास रेल्वेच्या विविध कामगार संघटनांनी विरोध केल्यानंतर प्रशासनाने मतदानासाठी तारीख निघून गेल्यानंतरही भूमिका स्पष्ट न केल्याने अजनी रेल्वे संस्थेच्या निवडणुकीचा गुंता वाढला आहे.
संस्था नोंदणी कायदा १८६० चा दाखला देत रेल्वे कामगार संघटनांनी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी केली आहे. सर्वसाधारण सभेत संस्थेचा लेखाजोखा देण्यात यावा आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वेतील तीन प्रमुख संघटनांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. परंतु संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि रेल्वे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सहायक कार्मिक अधिकारी व्ही. व्ही. पाठक यांनी निवडणूक घोषित झाल्यावर वार्षिक सर्वसाधारण सभा बोलण्याची मागणी अवास्तव आहे, अशी भूमिका घेतली आणि मतदान २१ सप्टेंबर २०१५ ला घेण्याचे जाहीर केले. त्यानंतरही रेल्वे कामगार संघटनांचा विरोध कायम राहिला. शिवाय त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रिया संदर्भातील इतर मुद्देही उपस्थित करण्यात आले. संस्थेचा सदस्य नसलेल्या कर्मचाऱ्याची अनुमोदक म्हणून उमेदवाराच्या अर्जावर स्वाक्षरी घेण्यास पाठक यांनी असहमती दर्शवली होती.
यामुळे रेल्वे प्रशासन आणि कामगार संघटना यांचे अजनी रेल्वे संस्थेच्या निवडणुकीवरून मतभेद वाढत गेले. अखेर पाठक यांनी वादग्रस्त निवडणुकीचा मुद्दा रेल्वे विभागीय व्यवस्थापक अलोक कंसल यांच्यासमोर ठेवला आहे. संबंधित विभागाचे प्रमुख म्हणून यासंदर्भात ते काय निर्णय घेतात याकडे कर्मचारीवर्गाचे लक्ष लागले आहे.
स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी कंसल यांच्याशी संपर्क साधला. रेल्वे कामगार संघटनांनी निव्ेादन दिल्यानंतरही असंवैधानिक पद्धतीने निवडणूक रेटून नेण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार त्यांनी केली.
यावर कंसल यांनी निवडणूक संवैधानिक मार्गाने आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या जाईल, असे पाटील यांना दूरध्वनीवरून सांगितले. परंतु निवडणूक केव्हा होईल, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. कंसल निवडणुकीच्या तारखेबाबत बोलले नाहीत.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे १७ ऑगस्टला अजनी येथील दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे इन्स्टिटय़ूटचा २०१५-१६ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १४ सप्टेंबरला मतदान घेण्यात येणार होते. त्यासाठी २७ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे होते. संस्थेचे २१५ मतदार असून त्यांना आठ सदस्यांची निवड करावयाची आहे. रेल्वे कामगार सेना, द.पू.मध्य रेल्वे मजदूर काँग्रेस आणि स्वतंत्र रेल्वे मजदूर युनियनने निवडणूक प्रक्रियेला जोरदार विरोध केला.
त्यासाठी इन्स्टिटय़ूच्या सदस्यांसह २७ जणांच्या स्वाक्षरीने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक घेण्यात येईल असे सांगितले आहे. सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीची तारीख मात्र निश्चित झालेली नाही, असे स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील म्हणाले.