22 April 2019

News Flash

मृत्यूनंतरही मैत्रीचा दरवळ सुवर्णपदकाच्या रूपात कायम

संगीताची अखंड साधना करणाऱ्या कोरटकर आणि मेश्राम यांची गेल्या ४५ वर्षांची मैत्री

तीन लाखांचा धनादेश कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांना सोपवताना केसर मेश्राम.

नागपूर :  मैत्रिणीच्या मृत्यूनंतरही तिची आठवण तिच्या संगीतातून कायम लोकांच्या स्मरणात रहावी या उदात्त हेतूने आकाशवाणीच्या माजी संचालक केसर मेश्राम यांनी सुहासिनी कोरटकर यांच्या नावाने विद्यापीठात संगीत विषयातील सुवर्णपदकासाठी तीन लाखांची देणगी दिली. त्यांनी आज धनादेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांच्याकडे सुपूर्द केला.

संगीताची अखंड साधना करणाऱ्या कोरटकर आणि मेश्राम यांची गेल्या ४५ वर्षांची मैत्री. गेल्यावर्षी ७ नोव्हेंबरला त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. मूळच्या वैदर्भीय असलेल्या कोरटकर यांना देशभरात एक मोठी गायिका नावाजल्या होत्या. त्यांनी भेंडीबाजार घराण्याला जिवंत ठेवले. संगीत प्रबोधनाच्या चळवळीत आकंठ बुडालेल्या कोरटकर यांनी पोटासाठी पेंशन मिळावी म्हणून २० वर्षांची नोकरी केली आणि नंतर राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले. सेवानिवृत्तीच्यावेळी त्या पणजी आकाशवाणीतील संगीत विभागाच्या संचालक होत्या. तर इकडे १९७३-७४मध्ये उद्घोषक म्हणून केसर मेश्राम यांची निवड करण्यात आली होती. त्या परभणी आकाशवाणीला होत्या. त्याच्या पुढल्याचवर्षी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्या पुणे आकाशवाणीत रूजू झाल्या. तो काळ आणीबाणीचा होता. त्याठिकाणी दोघींची ओळख झाली. तेथून जुळलेले मैत्री प्रेमाचे धागे आजही त्या सुवर्णपदकाच्या रूपात जतन करू पाहत आहेत. कोरटकर यांचे नागपुरात, विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयात, मुंबई, पुणे, हैद्राबाद येथे व्याख्याने, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. केंद्रीय अधिकाऱ्यांची एक संघटना त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेत असे.

सुहासिनीचे नाव कायम स्मरणात राहावे म्हणून सुवर्णपदकाच्या रूपाने मी तिला जिवंत ठेवू पाहात आहे. आमच्या मैत्रीमधील गोडवा विरघळू नये असे वाटले आणि तिच्या नावाने विद्यापीठाला सुवर्णपदकासाठी तीन लक्ष रुपये देऊ केले. आमची दोघींची मैत्री पुण्याच्या आकाशवाणीतून बहरली. तो आणीबाणीचा काळ होता. त्यानंतर नोकरीच्या जागा बदलत गेल्या पण, मैत्री कायम राहिली. त्यातील एक दुवा संगीत होता. एवढी मोठी शास्त्रीय संगीताची गायक मात्री जिवलग मैत्रीण होती हे ऋणनिर्देश या सुवर्णपदकाच्या रूपाने मी करीत आहे

– केसर मेश्राम, माजी संचालक, आकाशवाणी

First Published on May 19, 2018 2:53 am

Web Title: akashvani former director kesar meshram donate three lakh in university for music