९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भातील बुलढाणा जिल्ह्य़ातील हिवरा विवेकानंद आश्रम येथे होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. साहित्य संमेलनाच्या इतिहासातच प्रथमच ग्रामपंचायत पातळीवर एका गावात संमेलन होत असल्याचे ते म्हणाले.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाची रविवारी नागपूरमध्ये बैठक झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. संमेलनासाठी महामंडळाकडे सहा शहरांचे प्रस्ताव आले होते. त्यातील तीन शहरात संमेलन घेण्यासारखी स्थिती होती. त्यात दिल्ली मराठी प्रतिष्ठान, मराठी वाङ्मय परिषद बडोदा आणि बुलढाणा जिल्ह्य़ातील हिवरा आश्रम आदीचा समावेश होता. १९ आणि २० ऑगस्टला दिल्ली आणि बडोदा येथे तर ९ सप्टेंबरला हिवरामधील विवेकानंद आश्रमची निवड समितीने पाहणी केली. त्यानंतर हिवरा आश्रम येथे संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले, असे जोशी म्हणाले. दिल्लीला संमेलन घेण्यास मराठवाडा साहित्य परिषदेने विरोध केला होता. याशिवाय दिल्ली मराठी प्रतिष्ठाननेही दोन दिवस आधी महामंडळाला पत्र पाठवून संमेलन घेणे शक्य नसल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे बडोदा किंवा बुलढाणा जिल्ह्य़ातील हिवरा या दोनपैकी एका स्थळाची निवड होणे अपेक्षित होते. मराठवाडा साहित्य परिषद, तेलंगणा मराठी साहित्य परिषद, बडोदा मराठी वाङ्मय परिषद आणि संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी हिवरा येथे संमेलन घेण्यास विरोध करून बडोद्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, निवड समितीच्या बहुतांश सदस्यांनी हिवराला पसंती देऊन तसा अहवाल महामंडळाकडे दिला. त्यानुसार हिवराची निवड करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्य़ात होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असणार आहे. हिवरा येथील विवेकानंद आश्रमने जबाबदारी घेतली आहे, असे जोशी म्हणाले. यापूर्वी ८५ वे साहित्य संमेलन विदर्भात चंद्रपूरमध्ये झाले होते.

निवडणूक कार्यक्रम

९१ व्या संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जोशी यांनी जाहीर केला. त्यानुसार ५ ऑक्टोबरला महामंडळाकडून मतदार यादी उपलब्ध केली जाईल. १४ ऑक्टोबर ही महामंडळाकडे अध्यक्षपदासाठी नावे देण्याची अंतिम तारीख असून त्याच दिवशी सांयकाळी ७ वाजेपर्यंत रिंगणातील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. नावे परत घेण्यासाठी २३ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत असून, त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. मतदारांकडे मतपत्रिका ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पाठविण्यात येतील. त्या निर्वाचन अधिकाऱ्यांकडे ९ डिसेंबपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहचतील या बेताने मतदारांना पाठवायची आहे. १० डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक पारदर्शी व्हावी म्हणून यावेळी रजिस्टर पोस्टाने मतपत्रिका मतदारांकडे पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले.