30 September 2020

News Flash

पंचतारांकित जेवणावळींपेक्षा सकस वाङ्मयीन उपक्रमांवर भर हवा

निधी चणचणीच्या पाश्र्वभूमीवर झगमगाट टाळून संमेलन आदर्श करण्याची साहित्यिकांची सूचना

|| शफी पठाण

निधी चणचणीच्या पाश्र्वभूमीवर झगमगाट टाळून संमेलन आदर्श करण्याची साहित्यिकांची सूचना

यवतमाळात आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रस्तावित खर्च तीन कोटींच्या घरात आहे. यवतमाळसारख्या दुष्काळग्रस्त जिल्हय़ात होणाऱ्या या संमेलनासाठी निधीची चणचण भासत असल्याचे आयोजकांनीही मान्य केले आहे. त्यातही शासनाकडून मिळणाऱ्या ५० लाखांचे अनुदान टप्याटप्याने मिळत आहे. परिणामी निमंत्रित साहित्यिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली आहे. या सर्व खटाटोपावर प्रसंगी स्वत:ची पदरमोड करून साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या साहित्यिकांनी खंत व्यक्त केली आहे. संमेलनातील पंचतारांकित पंक्तीसाठी प्रत्येकवेळी गर्भश्रीमंत स्वागताध्यक्ष व शासनदरबारी पदर पसरण्यापेक्षा संमेलनाचे स्वरूप साधे ठेवून सकस वाड्:मयीन दर्जा कसा सांभाळता येईल, याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही या साहित्यिकांनी केले आहे.

एकेकाळी संमेलनांचे यशापयश जेवणावळीच्या दर्जावरून नव्हे तर तीन दिवस सुरू असलेल्या मायमराठीच्या सकस वाड्:मयीन सत्रांवरून ठरायचे. साहित्य संमेलनाचा मंच समाजासाठी दिशादर्शकाच्या भूमिकेत असायचा. परंतु पुढे संमेलनाच्या आयोजनाचे स्वरूप श्रीमंत, अतिश्रीमंत होत गेले आणि भाषा, साहित्य, संस्कृतीचा विकास हा विचार मागे पडून आयोजकांचे लक्ष संमेनलाच्या झगमगाटावरच केंद्रीत झाले. परंतु सगळयाच संमेलनांच्या नशिबी ‘पिंपरी-चिंचवड’ नसते. कधी हे संमेलन यवतमाळसारख्या कायम आर्थिक अभावात जगणाऱ्या जिल्हय़ाच्याही वाटयाला येत असते. यंदा तसेच घडले आहे. सुमारे तीन कोटींचे शिवधनुष्य पेलताना आयोजकांची दमछाक होत आहे. लोकवर्गणी आणि स्मरणिकेच्या जाहिरातीतून यातला बराचसा खर्च पेलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत साधे संमेलन घेऊन उर्वरित पैसा नापिकी व कर्जामुळे जीव देणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना दिला जावा, असेही काही सारस्वतांचे मत आहे.

वारकरी विठ्ठलाला पैसे मागतो का?

संमेलनाला निधीची चणचण भासत असल्याचे वृत्त आहे. असे असेल तर संमेलन साधेपणानेच व्हायला हवे. त्यासाठी निमंत्रित साहित्यिकांचे मानधन नाकारले तरी काही हरकत नाही. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारा वारकरी विठ्ठलाला पैसे मागतो का? आम्हीही पद्मगंधा साहित्य संमेलन नेमाने घेत असतो. पण, आमचे लक्ष संमेलनाच्या झगमगाटापेक्षा साहित्यकेंद्रीत मुद्दयांवर असल्याने आथिर्क प्रश्न आम्हाला त्रस्त करीत नाहीत.   – शुभांगी भडभडे, आयोजक, पद्मगंधा साहित्य संमेलन

यवतमाळकरांनी आदर्श उभा करावा

यवतमाळ हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. या जिल्हय़ाला लागलेले दुष्काळाचे ग्रहण आजही कायम आहे. अशा स्थितीत येथे साहित्य संमेलनावर कोटयवधींची उधळपट्टी म्हणजे मृत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे होईल. हे टाळून साहित्य संमेलनाच्या इतिहासातील सर्वाधिक कमी खर्चातील संमेलनाच्या आयोजनाचा आदर्श यवतमाळकरांनी उभा करावा, अशी अपेक्षा आहे.      – डॉ. हरिश्चंद्र बोरकर, आयोजक, झाडीबोली साहित्य संमेलन

संमेलन प्रबोधनाचे माध्यम व्हावे

साहित्य संमेलन हे प्रबोधनाचे माध्यम व्हायला हवे. आम्ही स्वखर्चाने व लोक सहभागातून राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन घेतो. गाव खेडय़ात खरे प्रबोधन घडवून आणतो. आम्ही कधी शासनाला अनुदान मागितले नाही. ते मागण्याची गरजही नाही. यवतमाळच्या संमेलनाचा उद्देशही  प्रबोधनच असेल तर आर्थिक चणचणीचा प्रश्नच उरणार नाही.    – ज्ञानेश्वर रक्षक, आयोजक, राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन

चणचण आहेच, पण संमेलन यशस्वी होईल

संमेलनाचा आयोजक हा वधुपित्याच्या भूमिकेत असतो. त्याचा खर्च व धावपळ शेवटपर्यंत संपत नाही. संमेलनासाठी लागणारा निधी मोठा आहे, त्याची जुळवाजुळव करताना कष्ट पडताहेत. जिल्हास्तरावर व शहरात काही ठिकाणी बुथ उभारून लोकवर्गणी गोळा करतोय. संमेलन साधेपणाने करण्यावरच आमचा भर आहे. जेवणात २५ पदार्थ आम्ही ठेवणार नाही. येणाऱ्या पाहुण्यांनी आमचा हा पाहुणचार गोड मानून घ्यावा.     – डॉ. रमाकांत कोलते, अध्यक्ष, डॉ. वि. भी. कोलते संशोधन केंद्र, यवतमाळ

महामंडळाची सूचना यवतमाळकर पाळतील

संमेलने तशीही कोणताही बडेजाव, धनशक्तीचे, ऐश्वर्याचे, प्रदर्शन न करणारी आणि अनावश्यक राजकारण्यांनी व्यासपीठे व्यापणारी  नसावीत,  साधेपणाने व्हावीत अशा नि:संदिग्ध शब्दात महामंडळाने आयोजकांना सूचना दिली आहे. यवतमाळकर ती पाळतील असा विश्वास आहे. कारण हे तर विदर्भ साहित्य संघ निमंत्रक संस्था असणारेच संमेलन आहे. पण, दहा वर्षांपूर्वीचे नागपूरचे जे संमेलन साधेपणासाठी  व कमी खर्चासाठी  आदर्श समजले गेले ते ७५ लक्ष रूपये खर्चाचे होते. त्या रकमेचे आजचे मूल्य २.५० कोटींचे झाले आहे, हेही समजून घेतले पाहिजे.      – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 12:16 am

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan 14
Next Stories
1 भूजल पातळी खालावल्याने जलसंकट
2 कीटकनाशकांच्या बाधेला जनजागृतीने प्रतिबंध
3 ..अन् विद्यार्थीच लेखक झाले
Just Now!
X