करोनाकाळ संपेपर्यंत वाट बघण्याची तयारी; घटक संस्थांचाही महामंडळाच्या सुरात सूर
शफी पठाण, लोकसत्ता
नागपूर : करोनाकाळात कुठलेही कार्य थांबू नये म्हणून सर्वच क्षेत्रांत ऑनलाइन माध्यमांचा पर्याय स्वीकारला जात आहे. साहित्य-संस्कृती क्षेत्रातील विविध संस्था, संघटनांचेही उपक्रम ऑनलाइन सुरू आहेत. परंतु अखिल भारतीय साहित्य महामंडळाने मात्र या माध्यमापासून अजूनही स्वत:ला चार हात लांब ठेवले आहे. परिणामी, साहित्यरसिकांना यंदा संमेलनालाच मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साधारणत: नोव्हेंबर महिन्यात महामंडळाची स्थळ निवड समिती इच्छुक स्थळांना भेट देऊन पाहणी करीत असते. परंतु यंदा करोनामुळे सारेच सामसूम आहे. मागच्या आठ महिन्यांत महामंडळाची बैठकही झालेली नाही.
यंदाचे संमेलन ‘ऑनलाइन’ घ्यावे, अशी आग्रही मागणी साहित्य वर्तुळातून होत आहे. परंतु महामंडळाला करोना कहर ओसरण्याचा दाट विश्वास असून तोपर्यंत थांबण्याची तयारी आहे. विशेष म्हणजे, महामंडळाच्या बहुसंख्य घटक संस्थांनाही पारंपरिक पद्धतीचेच साहित्य संमेलन हवे आहे. त्या दृष्टीने शासनाकडे निधीची मागणीही करण्यात आली आहे. परंतु शासनाने आधी स्थळ, वेळ ठरवा नंतर निधीचे बघू, असे बजावले आहे. अशा स्थितीत उगाच शासनाकडे आर्जव न करता स्वबळावर व अत्यल्प खर्चात ‘ऑनलाइन’ संमेलनाचे आयोजन करावे, अशी मागणी साहित्य क्षेत्रातून केली जात आहे.
हे नवमाध्यम स्वीकारल्यास जगभरातून मराठी लेखक आणि रसिकांना या संमेलनात सहभागी होता येईल. शिवाय यानिमित्ताने का होईना महामंडळ ‘ऑनलाइन’ होईल. आतापर्यंत नसलेले महामंडळाचे संकेतस्थळ निर्माण होऊ शकेल, ज्यावर वर्षभर साहित्यविषयक घडामोडींची माहिती मिळू शकेल, अशी अपेक्षा रसिक व्यक्त करीत आहेत. परंतु अद्याप तरी महामंडळाने या अपेक्षांची दखल घेतलेली दिसत नाही.
करोनामुळे का होईना ऑनलाइन पद्धतीने कमी खर्चातले उत्तम संमेलन घेण्याची संधी महामंडळाला या संकटात मिळाली आहे. आज सर्वच क्षेत्रे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. अगदीच त्या वेळेसच्या परिस्थितीमुळे एखाद्या स्थळी संमेलन घेणे शक्य झाले नाही तर ऑनलाइन संमेलन हा उत्तम पर्याय होऊ शकतो.
प्रा मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
महामंडळाची बैठकच झाली नसल्यामुळे अद्याप संमेलनाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. ऑनलाइन संमेलन हा पर्याय असला तरी संमेलनाचे मूळ स्वरूप बघता या नवमाध्यमावर ते कितपत यशस्वी होईल, काही सांगता येत नाही.
– विलास मानेकर, सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ
ऑनलाइन संमेलनाला बऱ्याच मर्यादा आहेत. ग्रामीण भागात अजूनही नीट नेटवर्क पोहोचत नाही. त्याशिवाय अनेक ज्येष्ठ साहित्यिक तंत्रस्नेही नाहीत. अशा स्थितीत ऑनलाइन संमेलन घेतले तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. याआधीही एप्रिलमध्ये संमेलन झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आणखी काही दिवस स्थिती बदलण्याची प्रतीक्षा करायला काय हरकत आहे?
– उषा तांबे, कार्याध्यक्ष, मुंबई मराठी साहित्य संघ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 8, 2020 3:13 am