08 December 2019

News Flash

अभाविप कार्यकर्त्यांचा विद्यापीठात धुडगूस

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिलांनाही धक्काबुक्की

तुटलेले गेट व कुलसचिव कक्षाची फोडलेली खिडकी.

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिलांनाही धक्काबुक्की

नागपूर : निवेदन देण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रचंड तोडफोड केली. या कार्यकर्त्यांना रोखण्याच्या प्रयत्न करणाऱ्या  महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना जखमी करून महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

या कार्यकर्त्यांनी कुलसचिव कक्षाच्या काचा फोडल्या. एमएसएफचे जवान योगेश गांगुर्डे यांच्या अंगावर गेट पडल्याने ते जखमी झाले तर एक महिला रक्षकाच्या हातालाही दुखापत झाली. आज शुक्रवारी दुपारी एबीव्हीपीचे ३०-४० कार्यकर्ते  विद्यापीठात कुलसचिव आणि कुलगुरूंच्या कक्षात शिरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना समोरच्या फाटकावरच रोखून धरण्याचा प्रयत्न सुरक्षा बलाच्या जवानांनी केला. त्यानंतर तोडफोड सुरू झाली. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ. नीरज खटी हे अधिकारी सायंकाळी विद्यापीठात नसतात. तरीही त्यांच्या कक्षात शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वरिष्ठ म्हणतात, विद्यार्थ्यांना मारायचे नाही!

एमएसएफच्या महिलांशी कार्यकर्त्यांनी र्दुव्‍यवहार केला. त्यातील एकीचा हात सुजला. पण, आमचे वरिष्ठ आम्हाला कारवाईचे आदेशच देत नाहीत. विद्यार्थ्यांना मारायचे नाही, असे सांगितले जाते. पण, एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. ही चौथी वेळ असून यापूर्वीही अनेकदा एबीव्हीपीने असाच गोंधळ घातला होता, अशी माहिती सुरक्षा बलाच्या जवानांनी दिली.

 

वेगवेगळ्या विषयांचे निकाल रखडले असून त्यासंबंधीचे निवेदन देण्यासाठी कुलसचिवांकडे जात होतो. मात्र सुरक्षा रक्षकांनी अडवले आणि धक्काबुक्की केली.

– वैभव बावनकर, शहर सचिव, एबीव्हीपी

कारवाईविषयी लगेच काही सांगता येणार नाही. आमच्या पातळीवर कारवाई करू. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई होईल.

– डॉ. नीरज खटी, प्रभारी कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

वरिष्ठांशी बोलून कारवाई केली मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नाही. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

– बाळू कांबळे, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बल

 

 

First Published on February 9, 2019 5:35 am

Web Title: akhil bharatiya vidyarthi parishad students create uproar in university
Just Now!
X