उत्पादन शुल्क खात्याकडून कारवाई

नागपूर : करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रथमच सलग पंधरा दिवसासाठी मद्यविक्री बंद केल्याने शहरात मोठय़ा प्रमाणात मद्याचा काळाबाजार सुरू आहे. दीडशे ते दोनशे रुपयांना मिळणारी बिअर पाचशे रुपयांना तर १८० एम.एल.ची क्वार्टर चारशे रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे, भेसळयुक्त मद्यविक्रीही वाढली असून त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूरमध्ये करोनाबाधित चार रुग्ण आढळल्याने सावधगिरीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गर्दीची ठिकाणे बंद केली होती. त्यात मद्यविक्रीची दुकाने व बिअर बारचाही समावेश होता. विशेष म्हणजे, विक्री बंद करतेवेळी विक्रेत्यांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. १४ मार्चला साडेचार वाजता आदेश जारी करण्यात आले व पाच वाजता दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे मद्य शौकिनांना साठा करण्याची संधीच मिळाली नाही. दुसरीकडे शहरात मोठय़ा प्रमाणात मद्याचा काळा बाजार सुरू आहे. बिअर, व्हिस्की, रम, व्होडका दामदुप्पट दराने विकली जात आहे. पन्नास रुपयाला मिळणारी देशी दारूची बाटली दीडशे रुपयाला विकली जात आहे. १८० ते २०० रुपयांना मिळणारी बीअर पाचशे रुपयांना, १२० ते १३०रुपयांना मिळणारी बाटली चारशे रुपयांना विकली जात आहे. काही विक्रेते घरपोच सेवा देत आहे. झोपडपट्टय़ांमध्ये भेसळयुक्त मद्यविक्री सुरू असल्याने त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

गर्दी टाळण्यासाठी बिअर बार बंद करणे  योग्य आहे. पण मद्य विक्रीच्या दुकानात ग्राहक अधिक वेळ थांबत नाही. त्यामुळे ही दुकाने काही तासासाठी सुरू ठेवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

भिवसेन खोरीत छापा

बंदीच्या काळात भिवसेनखोरी या भागात उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोहाची दारू (२००लीटर) जप्त केली. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी दुय्यम निरीक्षक नरेंद्र बोलघणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कवडू रामटेके, महिला शिपाई सोनाली खांडेकर, जवान महादेव कांगणे, शिरीष देशमुख व वाहन चालक राजू काष्टे यांनी सहभाग घेतला.

जिल्ह्य़ातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व भरारी पथके तसेच तपासणी नाक्या वरील अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. कारवाई वाढवण्यासाठी वाहन व मनुष्यबळात वाढ करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. ’’

– प्रमोद सोनोने, अधीक्षक, उत्पादन शुल्क खाते, नागपूर.