13 July 2020

News Flash

दारू, तांबे, अ‍ॅल्युमिनिअमची तस्करीही रेल्वे पार्सलने!

अनेक मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांमधील पार्सल बोगींचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत.

त्रयस्थ यंत्रणेमार्फत व्यापाऱ्यांचा गोरखधंदा

मंगेश राऊत, नागपूर

उपराजधानीतील भंगार व मद्य तस्करांनी आता रस्त्यावरून तस्करीला कमी प्राधान्य देत रेल्वेचा हुशारीने वापर सुरू केला आहे. रेल्वेच्या पार्सल बोगीचे कंत्राट त्रयस्त व्यक्तीकडे असल्याने त्यांना धाताशी धरून तस्करांनी रेल्वेमधून दारू आणि तांबे, अ‍ॅल्युमिनिअमची तस्करी सुरू केली आहे. रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या छुप्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा  आहे.

उपराजधानीत भंगारमधील तांबे व अ‍ॅल्युमिनिअमची मोठी बाजारपेठ आहे. अनेक व्यापारी तांबे व अ‍ॅल्युमिनियमचा खर्च कमी करण्यासाठी चोरीच्या मार्गाने देवाणघेवाण करतात. भंगार व्यापारीही यात गुंतलेले आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सावनेर परिसरात एका चोराला पकडले होते. त्याने कोटय़वधीचे तांबे व अ‍ॅल्युमिनिअम धातू रेल्वेच्या पार्सल बोगीतून दिल्लीला पाठवले होते. चोरीच्या सामान लपवण्यासाठी व कर चुकवण्यासाठी रेल्वेच्या पार्सल बोगीचा असाही राजरोसपणे दुरुपयोग सुरू आहे. यात गांधीबाग परिसरातील अनेक व्यापारी गुंतलेले असून रेल्वे प्रशासन, आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्य़ात दारूबंदी आहे. त्यामुळे तेथे नागपूर व भंडारा जिल्ह्यातून दारूची तस्करी करण्यात येते.        चंद्रपूर व वर्धा जिल्ह्य़ात नागपुरातून दारू तस्करी होत असून रस्त्याच्या मार्गाने दारू तस्करी करताना सापडण्याची भीती असते. आता दारू तस्करांनी रेल्वेचा मार्ग निवडला आहे. नागपुरातून चंद्रपूर व वर्धा जिल्हयात रेल्वे जात असून शहरातील तस्कर बाहेरूनच पार्सल बंद करून रेल्वेच्या पार्सल डब्यातून पाठवत असल्याची माहिती आहे. या गोरखधंद्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रजेवर असल्यामुळे प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, तर आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्तांनी प्रकरणात लक्ष घालून कठोर चौकशी कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली.

पार्सलचा वापर करण्यात अग्रवाल आघाडीवर

तांबे, अ‍ॅल्युमिनिअम, गुटखा, गुटख्याचा कच्च्या मालाची तस्करी करण्यात शहरातील सात ते आठ व्यापारी गुंतले असून यांमध्ये एक अग्रवाल नावाचा व्यापारी प्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे. व्यापारी तस्करी करण्यासाठी तांबे, अ‍ॅल्युमिनिअम व गुटख्याची अशापद्धतीने पॅकिंग करतात की रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येत नाही.

कंत्राटी पद्धतीमुळे तस्करीसाठी रान मोकळे

अनेक मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांमधील पार्सल बोगींचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत. यात बहुतांश कंत्राट हे व्यापाऱ्यांनी घेतले असून अधिक नफा कमावण्यासाठी त्यांनी प्रतिबंधित वस्तूंच्या तस्करीला प्राधान्य दिले आहे. रेल्वेच्या डब्यात टाकण्यासाठी पाठवणाऱ्या वस्तू बाहेरूनच पॅकिंग करून पाठवण्यात येतात. यामुळे तस्करीला रान मोकळे झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 2:41 am

Web Title: alcohol copper aluminum smuggled by rail parcels too zws 70
Next Stories
1 मुलींच्या वसतिगृहातील ‘व्हेंडिंग मशीन’ ठरल्या शोभेच्या वस्तू
2 जेनेरिक औषध नाकारून ‘ब्रँडेड’चाच आग्रह!
3 रुग्णांच्या आहाराबाबतचे धोरण कागदावरच!
Just Now!
X