15 August 2020

News Flash

सॅनिटायझर टंचाईवर मद्यउत्पादकाच्या साथीने मात!

नागपूरमध्ये रुग्णालयांसाठी रोज एक हजार लिटर उत्पादन

संग्रहित छायाचित्र

चंद्रशेखर बोबडे

करोनाचे संकट उद्भवताच एकीकडे देशभरात हात निर्जुतूक करण्यासाठीच्या सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला, तर दुसरीकडे देशव्यापी अभूतपूर्व टाळेबंदीमुळे कारखाने ठप्प झाले. देशासाठी परीक्षेचा काळ ठरलेल्या या घडीला आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करून नागपूरमधील एका मद्यनिर्मिती कारखान्याने मद्याऐवजी सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. विशेष म्हणजे जवळपास निम्मे उत्पादन रुग्णालयांना मोफत, तर उर्वरित सरकारी दराने पुरविले जात आहे.

नागपूरमध्ये १९८३ पासून नागपूर डिस्टिलरी लि. हा मद्यनिर्मिती कारखाना सुरू आहे. तेथे देशी-विदेशी मद्याच्या विविध ब्रॅन्डचे बॉटलिंग केले जाते.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली. त्यानंतर मद्याची दुकाने, कारखानेही बंद करण्यात आले. दुसरीकडे देशभरात सॅनिटायझरची मागणी वाढल्याने त्याचा बाजारात प्रचंड तुटवडा निर्माण झाला. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यनिर्मिती कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ‘नागपूर डिस्टीलरी प्रा. लि.’ या बॉटलिंग प्लॅन्टने सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. तेथे दिवसाला सरासरी एक हजार लिटरचे उत्पादन होत आहे. हे सॅनिटायझर धर्मादाय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सरकारी रुग्णालय, डॉक्टर आणि वितरकांना पुरविले जात आहे. नागपुरातच सॅनिटायझर उपलब्ध होत असल्याने शहरात त्याचा तुटवडा कमी झाला आहे. कारखान्याचे मालक जगतारसिंह सेठी यांनी सांगितले की, सरकारने आवाहन केल्यावर आम्ही सॅनिटायझर निर्मितीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेतली. टाळेबंदीच्या काळात कारखाना सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. कामगारांना कामावर येता यावे म्हणून पोलिसांनी मदत केली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने आणि निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या सहकार्यामुळेच ही बाब शक्य झाली. बॉटलिंगमध्ये मोठा वाटा असलेल्या बकार्डी या कंपनीने सॅनिटायझरचे निम्मे उत्पादन नि:शुल्क वाटप करण्यास सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

मद्याऐवजी सॅनिटायझर निर्मितीमागे नफा कमावणे हा उद्देश नाही, तर आणीबाणीच्या काळात समाजाला, सरकारला मदत करणे हा हेतू आहे. सरकारने मदत केल्यानेच हे शक्य झाले आहे.

– जगतारसिंह सेठी, संचालक, नागपूर डिस्टिलरी प्रा. लि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 1:10 am

Web Title: alcohol manufacturer overcomes sanitizer scarcity abn 97
Next Stories
1 देशाच्या तुलनेत राज्यात करोना मृत्यूचे प्रमाण अधिक!
2 नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांसह १४ जण विलगीकरण कक्षात
3 टाळेबंदीच्या काळात अधिकाऱ्यांना बदलीचे आदेश 
Just Now!
X