विद्यार्थी अद्ययावत शिक्षणाला मुकण्याची शक्यता

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) पहिले शैक्षणिक सत्र लवकरच मेडिकलमध्ये सुरू होणार आहे, परंतु डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक संगणकांसह प्रोजेक्टरवरील सादरीकरणासाठीच्या साधनांची खरेदी अद्यापही आरोग्य मंत्रालयाने केलेली नाही. त्यामुळे या संस्थेच्या डिजिटल स्वरूपाचे स्वप्न तूर्तास दूरच आहे. ही साधने वेळीच न मिळाल्यास विद्यार्थी डिजिटल शिक्षणाला मुकून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

उपराजधानीतील एम्ससाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दिल्लीत सुरू आहे. पहिल्या दोन फेरींमध्ये सुमारे ३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. दिल्लीत या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी लवकरच होणार असून त्यात सर्व ५० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होईल. तिसऱ्या फेरीत काही विद्यार्थ्यांच्या संस्थेत बदलही शक्य आहे. दरम्यान, दिल्लीतील एम्समध्ये विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणासाठी डिजिटल प्रणालीवर भर दिला जातो. त्यासाठी तेथील प्रत्येक वर्गात संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाची सोय असते. या पद्धतीच्या शिक्षणासाठी प्रोजेक्टर, संगणकांसह इतर काही साधनांची गरज असते.

उपराजधानीतील वर्ग लवकरच सुरू होणार असल्याने ही साधने येथे लागणे अपेक्षित होते, परंतु अद्याप केंद्रीय आरोग्य मंत्रालयातून एकाही साहित्याची खरेदी झाली नाही. दिल्लीतील एम्समध्ये नित्याने आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे वर्ग व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतले जातात. नागपूरला मात्र अशी सुविधा नाही. त्यातच नागपूरच्या एम्सचे पालकत्व दिल्लीच्या एम्सकडे आहे. त्यामुळे दिल्लीतील तज्ज्ञ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नागपुरातील विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. ही सुविधा नसल्याने सुरुवातीला विद्यार्थी या वर्गालाही मुकण्याची शक्यता आहे.

या विषयावर एम्सच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून एचएलएल कंपनीकडे मागण्यांबाबतचा प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले, परंतु त्यांच्या पातळीवरच अद्याप खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने हे साहित्य आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, परंतु लवकरच एम्सला संचालक मिळणार असल्याने त्यानंतर या खरेदीला गती मिळण्याची आशा त्यांनी वर्तवली. दरम्यान, मेडिकलची ई-लायब्ररी एम्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे, परंतु ही ई-लायब्ररी अद्यापही पूर्णपणे ऑनलाईन झाली नाही. त्यामुळे मेडिकलच्याच विद्यार्थ्यांना या लायब्ररीचा लाभ नाही. तेथे एम्सच्या विद्यार्थ्यांना कसा लाभ होणार, हा प्रश्न कायम आहे.

शासनाच्या सूचनेवरून एम्स सुरू करण्यासाठी मेडिकल प्रशासन पूर्ण मदत करत आहे, परंतु एम्सचे साहित्य हे त्यांनाच खरेदी करावे लागणार आहे. एम्सच्या स्थानिक प्रशासनाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला अनेक वस्तू खरेदीबाबदचे प्रस्ताव पाठवले आहे. केंद्र सरकार सकारात्मक असल्याने लवकरच हे साहित्य उपलब्ध होण्याची आशा आहे. त्यामुळे एम्समध्ये डिजीटल शिक्षणाबाबत काहीही त्रास होणार नाही.     – डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.