नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

नागपूर :  नागपुरातील करोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरात सव्‍‌र्हेची घोषणा केल्यानंतर लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतगर्म्त येणाऱ्या सुमारे ५० हजार कुटुंबातील दोन लाख लोकांपर्यंत मनपाच्या आरोग्य विभागाची चमू पोहोचली. आता या दोन झोनव्यतिरिक्त संपूर्ण नागपूर शहरात असा सव्‍‌र्हे होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार उर्वरित आठ झोनमध्येही हा सव्‍‌र्हे करण्यात येणार आहे. ‘करोना’विषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार म्हणाले, या संपूर्ण सर्वेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र राहणार आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. गंटावार यांनी केले आहे.नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, ज्या कोणाला आरोग्याचा काही त्रास जाणवत असेल त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती द्यायची आहे. कुणालाही दवाखान्यापर्यंत जाण्याची गरज नाही.

नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांची चमू संबंधित घरापर्यंत जाईल आणि तेथे उपचार देईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनानचे पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.