महापालिका सभेत नगरसेवकांचा आयुक्तांना सवाल; आज आयुक्त काय बोलणार?

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध महापौर संदीप जोशी यांनी केलेल्या पोलीस तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी झालेली महापालिकेची सर्वसाधारण सभा सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर केलेल्या कठोर टीकांनी गाजली. तुम्ही कार्यक्षम अन् आम्ही निकामी कसे, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी आयुक्तांना केला. विशेष म्हणजे, शनिवारी ही सभा अर्ध्यावर सोडून जाणारे आयुक्त तुकाराम मुंढे आज मात्र या सभेला पूर्णवेळ उपस्थित होते.

नगरसेवकांना विश्वासात न घेता प्रशासनाकडून होणाऱ्या एककल्ली कारभारावर सदस्यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. कामकाजात कुठेही एकसूत्रीपणा नसताना आयुक्त केवळ आपलीच पाठ थोपटण्यात मग्न असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. शनिवारी आयुक्तांच्या सभात्यागामुळे स्थगित झालेली सभा आज झाली. मात्र आजही चर्चा  अपूर्ण राहिल्याने बुधवारी पुन्हा चर्चा होणार आहे. यावर आयुक्त मुंढे काय उत्तर देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे नितीन साठवणे आणि शिवसेनेच्या मंगला गवरे यांनी आयुक्तांच्या विरोधात दिलेल्या  स्थगन प्रस्तावावर सभेत दिवसभर चर्चा झाली. विलगीकरणाच्या कामात अडथळा आणला म्हणून साठवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेवकांना विश्वासात न घेता आयुक्त काम करीत असल्याने त्यांच्या विरोधात नगरसेवकांमध्ये रोष वाढला, ते नगरसेवकांचे अस्तित्व संपवण्यासाठी काम करीत आहे की काय, असे त्यांच्या कार्यशैलीवरून वाटते, असा आरोप भाजपचे रवींद्र भोयर यांनी केला. प्रभागातील कामे होत नसल्याने नागरिकांच्या नजरेत नगरसेवकांची प्रतिमा मलीन होत आहे, याकडे काँग्रेसच्या दर्शना धवड यांनी लक्ष वेधले. यावेळी अविनाश ठाकरे, परिणीता फुके, प्रकाश भोयर, नेहा निकोसे, मनोज गावंडे, लहूकुमार बेहते, मनोज चाफले, जितेंद्र घोडेस्वार, हर्षला साबळे, दीपराज पार्डीकर, जुल्फीकार भुट्टो, नेहा निकोसे, मनोज गावंडे आदींनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर टीका केली.

आमचा अपमान होत नाही का?

आपला मान राखला गेला नाही म्हणून आपण सभात्याग करता. पण आम्ही तुमच्या कक्षासमोर तासन्तास उभे राहतो. त्यावेळी आमचा अपमान होत नाही का, असा सवाल भाजपच्या यशश्री नंदनवार यांनी आयुक्तांना केला. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आहे. मात्र आपण पाठ थोपटून घेत आहात, अशी टीका त्यांनी केली.

सेनेच्या गवरे यांच्या प्रस्तावावर राजकारण

शिवसेनेच्या सदस्य मंगला गवरे यांनी आयुक्तांच्या विरोधात दिलेला स्थगन प्रस्ताव महापौरांना पत्र पाठवून मागे घेण्याची विनंती केली. त्या सभेलाही गैरहजर असल्याने काँग्रेसचे प्रफुल गुडधे यांनी त्यावर चर्चा न करण्याची विनंती केली. भाजपचे प्रवीण दटके यांनी त्याला विरोध केला. महापौर संदीप जोशी यांनी यावर मतदान घेतले. बहुमताच्या आधारावर मंगला गवरे यांच्या स्थगन प्रस्तावर चर्चा झाली. दरम्यान गवरे यांनी प्रस्ताव मागे घेण्यासाठी कोणी दबाव आणत असल्याची  शंका व्यक्त केली तर प्रवीण दटके यांनी मंगला गवरे यांच्या बदलेल्या भूमिकेबाबत मुंबईवरून दबाव आल्याचे सांगितले.

आयुक्तांमुळे प्रतिमा मलीन

आयुक्तांनी गेल्या अडीच महिन्यात समाज माध्यमातून स्वत:चे प्रतिमावर्धन करताना नगरसेवकांची प्रतिमा मलीन केली आहे. लोक आम्हाला चोर, फसवणूक करणारे, काम न करणारे समजतात व तशा पोस्टही समाजमाध्यमावर करतात याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले.