एनव्हीसीसीतर्फे राजकीय नेत्यांना निवेदन

नागपूर : नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने शहरातील विविध मोठय़ा नेत्यांना निवेदन देऊन व्यवसायाच्या वेळेत वाढ करून रात्री आठपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मागितली आहे.

शहरात करोना आटोक्यात आहे. तरीही व्यवसायिकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. दुपारी चार वाजता पूर्ण बाजारपेठा बंद करण्याचे निर्देश आहेत. या वेळेत व्यवसाय होत नाही. ७ जून रोजी सरकारने रुग्णालयात उपलब्ध खाटा व करोना रुग्णसंख्येनुसार लेव्हल एक ते लेव्हल पाचमध्ये असलेल्या जिल्ह्यंमध्ये निर्बंध लावले आहेत. नागपूर लेव्हल एकमध्ये मोडते. सध्या नागपुरात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून मृत्यूसंख्याही घटली आहे. शहरात केवळ दहा-वीस बाधित आढळत आहेत. यामुळे शहरात बाजारपेठा रात्री आठ वाजेपर्यंत आणि हॉटेल व्यवसाय रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची आणि आठवडय़ातून सहा दिवस व्यवसाय करण्याची मागणी निवेदनात केली आहे. एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव रामअवतार तोतला, उपाध्यक्ष अर्जुनदास अहुजा, सहसचिव स्वप्निल अहिरकर आदींनी आधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.