दलित सुधार योजनेंतर्गत उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन संस्थेचा विकास पदव्युत्तर संस्थेच्या धर्तीवर करण्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने २०१३ साली मंजुरी दिली होती. परंतु त्यानंतरही नागपूरकरिता महत्त्वाकांक्षी असलेल्या ४३३ कोटींची योजना मंत्रालयात धूळखात आहे. या संस्थेचा विकास होत नसल्याने सध्या येथे केवळ ताप व सर्दीचे रुग्ण बघितले जात असून रुग्णांना अद्यावत उपचार मिळत नाहीत.

या संस्थेत विविध प्रकारचे १५ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करून ४३३ कोटी रुपयांतून अद्यावत सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा आघाडी सरकारच्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. यासाठी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रयत्न केले होते. तसा निर्णयही २०१३ साली मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रकल्पाकरिता राज्य शासनाच्या योजनेसह दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाज कल्याण विभागाकडून संस्थेकरिता निधी दिला जाणार होता. त्या अंतर्गत सुमारे ३५ कोटी रुपये सदर संस्थेकरिता मिळाले होते. त्यातील ७० लाख रुपये वगळता इतर निधी या संस्थेचे पालकत्व असलेल्या मेयो प्रशासनाला खर्च करता आले नाहीत.

गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प थडंबस्त्यात आहे. या संस्थेचे काम सुरूहोत नसल्याचे बघत नागरिकांमध्ये वाढणारा असंतोष बघत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १४ ऑक्टोबर २०१५ मध्ये मुंबईत एक बैठक घेतली.

बैठकीला काँग्रेसचे नेते डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, मेयोचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांच्यासह शहरातील काही लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेकरिता शेजारच्या सुमारे दोन एकर जागेचा तिढा सुटला असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली. बैठकीत तातडीने ही जागा संस्थेकरिता हस्तांतरित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या.

अद्यापही या संस्थेच्या बाबतीत काहीच प्रगती झाली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. तेव्हा या संस्थेचे काय होणार? हा प्रश्न नागरिक उपस्थित केला जात आहे. ही संस्था होत नसल्याने निश्चितच विदर्भातील पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना कमी दरात हे वैद्यकीय अभ्यासक्रम करता येत नाही.

सोबत येथील विकासाचा ‘मास्टर प्लान’वर निर्णय होत नसल्याने येथे रुग्णांकरिता अद्यावत सुविधा उभारता येत नसल्याचे चित्र आहे. निश्चितच त्याने सामान्य रुग्णांना येथे अद्यावत उपचार उपब्ध होण्यास अडचण येत आहे. तेव्हा नागरिकांना येथे चांगल्या वैद्यकीय सेवा मिळणार कधी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विषयावर मेयोचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

संस्थेतील वैशिष्टय़े

  • सुपरस्पेशालिटीच्या सेवा असलेले रुग्णालय.
  • हृदयरोगासह १४ प्रकारचे विभाग राहणार.
  • ९ मजली इमारतीत अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर.
  • पदव्युत्तरच्या ३४ जागा वाढणार.
  • ६५० नवीन पदांची निर्मिती होणार.
  • रुग्णांना अद्यावत पद्धतीचा उपचार मिळणार.