भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांचा समारोप ११ एप्रिलला येथील कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

नागपुरात दीक्षाभूमी असल्याने या शतकोत्तर जन्मशताब्दीचा समारोप येथे करण्यात येत आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर ते कस्तुरचंद पार्कवरील जाहीर सभेला संबोधित करतील.तत्पूर्वी, दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास कस्तुरचंद पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या कार्यक्रमाला लोकसभेतील काँग्रेस पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. समारोप कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा बैठकीला राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शरद रणपिसे, विजय वडेट्टीवार, माजी नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी उपस्थित होते.

उर्दू साहित्यिकांची मुस्कटदाबी

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उर्दू साहित्यांविरुद्ध फतवा काढला आहे. एका राजकीय पक्षाला जनतेने निवडून दिले आहे. त्या सरकारविरोधात बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार राज्यघटनेने बहाल केला आहे. तो अधिकार सरकार हिसकावू पाहत आहे. या सरकारला सर्व उर्दू साहित्यिक देशद्रोही आहेत, असे वाटते काय? सरकारकडून साहित्यिकांची सातत्याने मुस्कटदाबी होते आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.