उपराजधानीतील हिरवळीला जीवदान

पर्यावरण ही ‘पॅशन’ कमी आणि ‘फॅशन’अधिक झाली आहे, असे म्हणतात ते खोटे नाही. प्रसिद्धी मिळवायची असेल तर एक झाड लावायचे आणि नावामागे ‘पर्यावरणप्रेमी’ अशी बिरुदावली चिपकवायची. मात्र, ‘फॅशन’च्या पलीकडे जाऊन ‘पॅशन’म्हणून काम करणारे काही लोक आहेत. त्यातीलच एक नाव जतिंदर सिंग पाल वान. ही व्यक्ती वृक्षारोपणच करत नाही तर स्वत:सोबत इतरांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन देखील करते. त्यांची ‘प्लान्ट अ‍ॅम्बुलन्स’ उपराजधानीतील सोकावणाऱ्या हिरवळीला जीवदान देण्याचे काम करीत आहे.

पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे आवाहन केले जाते. त्या आवाहनाला प्रतिसादही मिळतो, पण केलेल्या वृक्षारोपणानंतर काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. एकदा वृक्षारोपण केल्यानंतर ते जगले की वाचले, याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. मात्र, जतिंदर सिंग स्वत: तर वृक्षारोपण करून त्याची काळजी घेतातच, सोबतच इतरांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या संवर्धनाची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आहे. त्यांची ‘प्लान्ट अ‍ॅम्बुलन्स’ शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. स्वत:च्या ‘वॅगनार’ या चारचाकी वाहनाला त्यांनी ‘प्लान्ट अ‍ॅम्बुलन्स’ मध्ये रूपांतरित केले आहे. या वाहनात दररोज ते ५०-५० लीटरच्या पाण्याच्या दोन टँक भरून ठेवतात. याशिवाय वृक्षाच्या संवर्धनासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी वाहनात ठेवले आहे. रस्त्याने जाता-येताना जिथेही  सोकावलेले वृक्ष दिसले त्याठिकाणी थांबून पाणी दिले जाते. एवढेच नाही तर जिथे झाडांना कापण्याची, बांधण्याची गरज पडली ते काम देखील केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत असताना कधी प्रसिद्धीच्या भानगडीत ते पडले नाहीत. मागील वर्षीच्या पावसाळ्यात त्यांनी जवळजवळ वृक्षारोपणाचे १५ प्रकल्प राबवले. हे सर्वच प्रकल्प यशस्वी ठरले आहेत, कारण त्याची देखभाल ते करत आहेत. पर्यावरणासाठी आवश्यक अशाच झाडांची त्यांनी वृक्षारोपणासाठी निवड केली आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वृक्षारोपण कसे करायचे आणि त्याचे संगोपन कसे करायचे, याचीही प्रात्यक्षिके देत असतात. भविष्यातही वृक्षसंगोपनासाठी त्यांनी अनेक आराखडे तयार केले आहेत. ‘ग्रीन फोर्स’ नावाची त्यांची चमू दररोज या ‘प्लान्ट अ‍ॅम्बुलन्स’च्या माध्यमातून शहरातील वृक्षांची काळजी घेत असते.