‘बिग बी’ अशी बिरुदावली मिळवलेला महानायक अमिताभ बच्चन यांनी राज्याचा ‘व्याघ्रदूत’ म्हणून स्वीकारलेली जबाबदारी आता प्रत्यक्षात उतरणार आहे. मुंबईहून निघालेल्या व्याघ्रसंवर्धन रॅलीच्या उद्घाटनानंतर या व्याघ्रदूताची कामगिरी ऐकिवात नव्हती. मात्र, येत्या ऑक्टोबरमध्ये देशीविदेशी व्याघ्रप्रेमींची पहिली पसंती ठरलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात चक्क चार दिवस या व्याघ्रदूताचा मुक्काम असणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन यांच्या दौऱ्याच्या वृत्तास पुष्टी दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून धुरा हाती घेतल्यानंतर पहिलाच आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन वनखात्याच्या मुख्यालयी नागपुरात साजरा होत आहे. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन येणार अशी बरीच चर्चाही रंगली. मात्र, वनमंत्र्यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या वन्यजीव सप्ताहात या महानायकाचे आगमन होणार असल्याचे संकेत आहेत. अजून तारीख निश्चित नसली तरीही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात त्यांच्या चार दिवसांच्या मुक्कामावर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे. वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी धुरा हाती घेतल्यानंतर व्याघ्र आणि जंगल संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून व्याघ्रसंवर्धन प्रकल्पांतर्गत चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटात व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका आहे. व्याघ्रसंवर्धन प्रकल्पांतर्गत होणाऱ्या चित्रपट निर्मितीचे काम ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात होणार असल्याने या ठिकाणी ते येणार आहेत. तब्बल चार दिवस ते या व्याघ्र प्रकल्पात तळ ठोकणार आहेत. उत्तम अभिनयाकरिता त्या व्यक्तिरेखेच्या भावविश्वात जाऊन त्यांच्या जाणीवेचे प्रतिरूप सादर करायचे असते, असे खुद्द अमिताभ बच्चन यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्याच्या अंमलबजावणीसाठी ते ताडोबात चार दिवस मुक्काम ठोकणार आहेत. ऑक्टोबरमधील त्यांच्या चार दिवसांच्या मुक्कामात व्याघ्रसंवर्धनावरील चित्रपटाच्या कार्यासोबतच येथील वन कर्मचाऱ्यांशीसुद्धा ते संवाद साधणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.