‘नोटबंदी’ हा निव्वळ फार्स असून केवळ भांडवलदार आणि खाजगी बँकांना लाभ पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यात सर्व नियम धाब्यावर बसवून हुकूमशाहीच्या माध्यमातून लोकशाही राबवली जात असल्याची घणाघाती टीका अर्थशास्त्राचे अभ्यासक विश्वास उटगी यांनी आज पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानां दरम्यान केली. जनमंचचे उपाध्यक्ष अमिताभ पावडे अध्यक्षस्थानी असलेल्या व्याख्यानाचा विषय ‘नोटबंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम’ असा होता.

उटगी म्हणाले, नोटबंदीने गरिबांच्या हातचा पैसा हिरावला, त्यांचा रोजगार संपवला आणि आता नवीन रोजगार निर्मिती सुद्धा होत नाही. तीन लाखांवर लक्ष लघु उद्योग बंद पडले आहेत आणि त्यावर उपजीविका करणारे ४५ लक्ष हातांना काम उरले नाही. नोंटबंदीने क्रयशक्ती संपवली. त्यामुळे दोनवेळच्या जेवणाची भ्रांत गरिबांना पडली आहे. काही प्रमाणात फायदा झाला तो हिरे व्यापाऱ्यांचा! मोदी सरकार भांडवलदारांचे भलामण करणारे सरकार असून त्यांच्याच सोयीचे निर्णय घेतले जातात. देशाचा अर्थसंकल्प असो की राज्याचा अर्थसंकल्प असो या नोटाबंदीविषयी कोणतेच विवरण त्यात आले नाही. मात्र, देशाच्या आर्थिक पाहणी अहवालात सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) एक टक्क्याने कमी झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री अर्थव्यवस्था आठ टक्क्यावर घेऊन जाण्याच्या वल्गना करतात. भांडवलदारांच्याच हिताचे निर्णय मोदी सरकार घेत असून जीएसटी अंतर्गत शेतकऱ्यांना आणि अंबानीला सारखाच कर कसा काय असू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालय, मुख्य निवडणूक आयोग, आरबीआय या देशाच्या स्वायत्त संस्था आहेत. मात्र, त्यांची स्वायत्तता या शासनाने धोक्यात आणली आहे. आजच्या घडिला आरबीआय हे अर्थखात्याचा एक विभाग असल्यासारखे आहे. आतापर्यंत या संस्थने मिळविलेली प्रतिष्ठा या शासनाने गमावली आहे. हुकुमशाही पद्धतीने लोकशाही राबवली जात असून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या सर्व गोष्टी नोटबंदीशी जुळल्या असल्याचे उटगी म्हणाले. अमिताभ पावडे यांचे अध्यक्षीय भाषण झाले.

बँकेचे पैसे थकविणारे चोरच

१६ लक्ष कोटी बँकांचे थकित कर्ज आहे. येस बँक, कोटक महेंद्रा, एचडीएफसी इत्यादीने इंडियन प्रिमियर लीगला हा पैसा कर्ज स्वरुपात दिला आहे. आयपीएल म्हणजे सट्टा. या सट्टा, बेटिंग, ड्रगचे आर्थिक गणित आपल्या बजेटपेक्षाही मोठा आहे. प्रिमियर लीग मधील संघ बडय़ा उद्योगपतींचे, अभिनेत्यांचे आहेत. सहाराचा मालक सुब्रतो रॉय तिहार कारागृहात आहे मात्र, आपले क्रिकेटर आणि हॉकी खेळाडू त्यांचे टी शर्ट घालून खेळतात. ज्याप्रमाणे वीज चोरी, पाणी चोरी गुन्हा आहे. त्याप्रमाणे बँकांकडून पैसा घेऊन तो परत न करणारे एकप्रकारे चोरीच करतात. मग तो विजय माल्या असो की आणखी कोणी?  त्यांच्यावर कोणतीच कारवाई मोदी शासनाने केली नाही, असे उटगी म्हणाले.