विदर्भात ११,२४०  ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

विदर्भात वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांमध्ये अमरावती जिल्हा आघाडीवर  असून बुलढाणा जिल्ह्य़ाचा दुसरा  क्रमांक आहे. १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत विदर्भातील एकूण १.७५ लाख थकबाकीदार ग्राहकांपैकी ११,२४० जणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

विदर्भातील ११ जिल्ह्य़ांमध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गातील १ लाख ७६ हजार ९७९ ग्राहकांकडे १ फेब्रुवारीपर्यंत ७० कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी होती. त्यातील बहुतांश जणांनी दोन महिन्यांपासून वीजबिलांचा भरणा केला नाही.

थकबाकीदारांमध्ये अमरावती जिल्ह्य़ातील ३०,२६७ ग्राहकांकडे १०.९१ कोटी, बुलढाणातील २३,७२२ ग्राहकांकडे १३.८५ कोटी, यवतमाळ येथील २२,२५१ ग्राहकांकडे ७.२१ कोटी, नागपूरच्या २१,५३१ ग्राहकांकडे ६.७९ कोटी, अकोलातील १५,९५६ ग्राहकांकडे १२.०९ कोटी, गडचिरोलीतील १४,८५९ ग्राहकांकडे २.३५ कोटी, चंद्रपूरच्या १४,६९२ ग्राहकांकडे २.६२ कोटी, वर्धेतील ११,८५४ ग्राहकांकडे २.२० कोटी, वाशीमच्या ९५८१ ग्राहकांकडे १०.३१ कोटी, गोंदियातील ६७६७ ग्राहकांकडे १.१३ कोटी, भंडारातील ५४९९ ग्राहकांकडे ०.८३ कोटींची थकबाकी होती. महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवल्यामुळे अनेकांनी देयकांचा भरणा केला.