* कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचे यश

* टाटा ट्रस्टने दिला मदतीचा हात

कर्णदोष घेऊन जन्माला आलेल्या १०८ चिमुकल्यांनी पहिल्यांदा आवाज ऐकला आणि बोबडे बोलही उच्चारले. कॉकलिअर इम्प्लांटची शस्त्रक्रियेमुळे हे शक्य होऊ शकले. या चिमुकल्यांसाठी टाटा ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला. ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्टने हे विधायक कार्य घडवून आणले.

टाटा ट्रस्टचे वैद्यकीय विभागाचे प्रमुख कुमार चैतन्य यांनी याबाबत माहिती दिली. ऑरेंज सिटी रुग्णालयाकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, ऑरेंज सिटी रुग्णालयाचे डॉ. अनुप मरार, विभागीय आयुक्त संजीव कुमार उपस्थित होते. दुर्बल घटकातील गरजू रुग्णांसाठी देशातल्या बहुतांश सर्वच राज्यांमध्ये टाटा ट्रस्ट सामाजिक भावनेतून काम करीत आहे. उपराजधानीत जन्मत: कर्णदोष घेऊन जन्मणाऱ्यांवर काकॅलिअर इम्प्लांटमुळे भविष्यातील अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे चैतन्य यांनी सांगितले. डॉ. अनुप मरार म्हणाले, जन्म झाल्यावर प्रत्येक मुलांची कर्णदोष चाचणी गरजेची आहे. वेळीच निदान व उपचारातूनच या मुलांना अपंगत्वातून बाहेर काढता येते. डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, शासनाने आरोग्य धोरणात अर्भक श्रवण चाचणीचा समावेश केला आहे. मूल जन्माला आल्यानंतर अगदी काही तासांतच ही चाचणी केली जाते. वेळीच उपचारामुळे बालकाला भाषा आणि इतर ज्ञान लवकर मिळते.

याप्रसंगी डॉ. आशीष दिसावल, नीलू सोमाणी, डॉ. उषा नायर, विद्या नायर, समन्वयक मंजिरी दामले, निशा अशोक, दीपाली कावल, एसआर. कविता गोटफोडे, डॉ. नूरुल अमीन, डॉ. दीपक डोंगरे, डॉ. समीर चौधरी उपस्थित होते.

देशात पाच ठिकाणी कर्करोग उपचार केंद्र

कर्करोगाचे वाढते प्रमाण बघता नागपुरात अलीकडेच सुरू झालेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटला प्रशिक्षणासह इतरही कार्यासाठी टाटा ट्रस्टकडून मदत केली जात आहे. लवकरच ईशान्य भारतातील आसाम येथे दोन कर्करोग उपचार केंद्र सुरू होतील. पुढच्या टप्प्यात मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे  कर्करोग सर्वोपचार केंद्र सुरू होणार आहेत. याखेरीज रुग्णालयांना आवश्यक प्रशिक्षण मुंबई येथील टाटा मेमोरियल ट्रस्टतर्फे दिले जात असल्याचेही कुमार चैतन्य यांनी सांगितले.