मुंबईतील रेल्वे पुलांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पूर्णपणे रेल्वेची असून अंधेरी येथील गोखले पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघाताची रेल्वेकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. हा पूल महापालिकेच्या मालकीचा असला तरी देखभाल दुरूस्तीसाठी पालिकेने रेल्वेला पैसै दिले होते त्यामुळे त्यांचा काहीही सबंध नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेची चूक नसल्याचे सांगितले.

गोखले पुल दुर्घटनेबाबत भाजपा सदस्य योगेश सागर यांच्यासह भारती लव्हेकर, अमित साटम, सुनिल शिंदे, सदा सरवणकर आदींनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.  रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार पुलांची बांधणी, दुरूस्ती आणि देखभालीची सारी जबाबदारी रेल्वे विभागाचीच आहे. मुंबईतील सर्व रेल्वे पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील पावसाळ्यापूर्वी सर्व पुलांची तपासणी आणि दुरूस्तीची कामे केली जातील असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील पूल आणि रस्त्यांवर विविध नागरी सुविधांचे जाळे आहे. त्यासाठी वारंवार रस्ते खोदले जातात. त्याऐवजी या सुविधांसाठी नवीन रस्ते वा पुलांची निर्मिती करताना स्वतंत्र कॉरीडोर निर्माण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

विमान अपघाताची चौकशी

घाटकोपर येथे विमान कोसळून झालेल्या अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डिजीसीए) कडून चौकशी सुरू आहे. हा अहवाल लवकरात लवकरात मिळावा यासाठी सरकारकडून पाठपुरावा करण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास विमान मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यानी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

घाटकोपर येथील जागृती पार्क परीसरात २८ जून रोजी चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात पायलटसह पाचजणांचा मृत्यू झाला होता.

अंधेरी पुलावरून भाजपची पालिकेवर टीका

मुंबई महापालिकेत ४ जुलैला, स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा गटनेते मनोज  कोटक यांनी या पुलाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. हा पूल बांधण्यासाठी पालिकेने रेल्वेला पैसे दिले होते. पुलावर मालकी हक्क सांगणाऱ्या पालिकेवरच या पुलाची जबाबदारी असल्याचे कोटक म्हणाले होते. चर खणताना ती घुसखोरी ठरत नसेल तर सुरक्षा तपासणी करताना पालिका घुसखोर कशी ठरेल, असा प्रश्न भाजपाचे नगरसेवक अभिजीत सामंत यांनी उपस्थित केला होता. प्रशासनाने स्वतहून या घटनेबाबत निवेदन सादर करायला हवे होते. मात्र त्यांनी स्वतची जबाबदारी झटकली असल्याचे प्रभाकर शिंदे म्हणाले होते. पूलावर विविध वाहिन्या टाकण्यासाठी चर खणण्याची परवानगी पालिकेने दिली असताना पुलाची तपासणी करण्याचे काम केवळ रेल्वेवर झटकता येणार नाही, असा आरोप करत नगरसेवकांनी स्थायी समितीची सभा तहकूब केली होती. दुर्घटनेदिवशी म्हणजे ३ जुलैला भाजप खासदार किरीट सोमय्या यांनीही रेल्वेऐवजी पालिकेलाच दोष दिला होता.