इंधन दरवाढ आणि वाढती महागाई या मुद्यावर केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दुसरीकडे सुरगाणा तालुक्यातील अवैध दारुविक्री थांबवावी, या मागणीसाठी बहुजन रयत परिषदेतर्फे निदर्शने करत आमरण उपोषणास सुरूवात करण्यात आली.
काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. राज्यात व केंद्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून महागाईने उच्चांक गाठला आहे. सरकारने इंधनावर अधिभार लावला. आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी तो निर्णय घेतल्याचे शासन सांगत असले तरी त्यांनी कोणत्या लोकोपयोगी योजना आणल्या, ज्यामुळे आर्थिक बोजा वाढला याचा खुलासा करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. उलट सरकारने विविध शासकीय योजनांना कात्री लावली. स्वस्त धान्य योजनेचा लाभ देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अंशदानात कपात केली. अंगणवाडी सेविकांना महिनोंमहिने मानधन मिळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सरकारने फेटाळून लावली तर दुसरीकडे श्रीमंत व्यापाऱ्यांना मात्र शेकडो रुपयांची करमाफी देण्याची तत्परता दाखविली जात आहे. कर वाढीला शेतकऱ्यांच्या मदतीच्या नावाचा मुलामा देत शेतकऱ्यांच्या नावावर जनतेचा खिसा कापण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सर्वसामान्यांवर लादलेली करवाढ तात्कार रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने जिल्हा प्रशासनास दिले.
दरम्यान, याच दिवशी बहुजन रयत परिषदेने ग्रामीण भागातील दारुविक्री बंद करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आमरण उपोषण सुरू केले. दारू बंदी करण्यासाठी वेळोवेळी निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. सुरगाणा तालुक्यात दारू विक्रीचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिवकालीन हतगड किल्ला परिसरात देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने आहेत. या दुकानांतुन पर्यटक दारू खरेदी करून गडावर मद्यप्राशन करतात. दारूच्या रिकाम्या बाटल्या तिथेच टाकून गडाची विटंबना करण्याचा प्रयत्न होत असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. मद्यपी पर्यटकांचा धांगडधिंगा किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करत आहे. महिलांशी असभ्य वर्तन केले जात असल्याने त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली. हे दुकान स्थलांतरीत करत परिसर दारू मुक्त करावा, अशी मागणी वारंवार करूनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचे अनील बावीस्कर, भरत जाधव यांनी म्हटले आहे.