डॉ. अ‍ॅन्जेलिका हिल्बेक यांची खंत

मागील तीन दशकांपूर्वी संपूर्ण जगातील गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगतीची साधने व जागतिक स्तरावरील कुपोषण निर्मूलन आणि भूकबळी थांबवणे या बाबी डोळ्यासमोर ठेवून जैवतंत्रज्ञानाचा वापर करुन शेतमालाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासोबतच वातावरणातील बदलांना अनुकूल असणाऱ्या नवीन वाणांची निर्मिती करण्यात आली. मात्र, आज तीन दशकांनंतरही जागतिक पातळीवर गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही, असे प्रतिपादन ईटीएच झुरीच येथील संशोधक डॉ. अ‍ॅन्जेलिका हिल्बेक यांनी केले.

‘जैवतंत्रज्ञान निर्मित पिके: आश्वासने व पूर्तता’ या विषयावर नीरीच्या सभागृहात डॉ. अ‍ॅन्जेलिका हिल्बेक यांचे सोमवारी व्याख्यान झाले. व्यासपीठावर ‘बीएआरसी’चे माजी वैज्ञानिक शरद पवार, सीएसआयआर-नीरीचे संचालक राकेश कुमार, माजी संचालक डॉ. सतीश वटे, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते.

गरीब व अल्पभूधारक शेतकरी आणि त्याची आर्थिक मिळकत विचारात न घेणे, जैवतंत्रज्ञान निर्मित पिकांच्या बियाणांची किंमत शेतकऱ्यांना परवडणारी नसणे, शेतकऱ्यांना शासनाकडून मोफत वा सवलतीच्या दराने बिायाणे पुरवठा न होणे आदी कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडले. त्यामुळे नवीन पिकांचा पाहिजे त्या प्रमाणात प्रसार झाला नाही.

जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या पिकांमुळे विशिष्ट ठिकाणी औद्योगिकरण व कृषी एकाधिकारशाहीला चालना मिळाली. जगात काही ठिकाणी तर तृणनाशक विरोधी गुणधर्म असणाऱ्या पिकांच्या लागवडीमुळे सूपीक जमिनीचे चक्क ओसाड जमिनीत रुपांतर झाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. युरोपमधील काही भागात अजैविक किंवा पारंपरिक पिकांच्या तुलनेत जैवतंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या वाणांमुळे उत्पादनात वाढ झालेली पाहायला मिळते, अशी परिस्थिती सगळीकडेच आहे असे ठामपणे सांगता येत नाही. शेतीउद्योग असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही पिके लाभदायक ठरली आहेत. या शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेल्या वाढींची कारणे, मात्र वेगळी आहेत, असेही डॉ. हिल्बेक म्हणाल्या. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. अ‍ॅन्जेलिका हिल्बेक यांनी दिली.

९९ टक्के उत्पादन : सोयाबिन, मका, कापूस व तेलबिया याच पिकांचा समावेश

सुमारे वीस वर्षांपूर्वी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या वाणांना व्यावसायिक तत्त्वावर लागवडीसाठी अतिशय गाजावाजा करुन परवानगी देण्यात आली. सुरुवातीच्या काळात अशा पद्धतीने तयार केलेल्या व विशिष्ट गुणधर्म असलेली केवळ चार वाणांची जगातील फक्त सहा देशात लागवड करण्यात आली. यात अमेरिका, अर्जेटिना, ब्राझिल, कॅनडा, भारत व चीन या देशांचा समावेश होता. मात्र, आजही त्याठिकाणी हवी तशी उत्पादकता वाढलेली नाही. कारण अशा वाणांची लागवड करून जगातल्या सर्व उत्पादनांपैकी सुमारे ९० टक्के उत्पादन याच देशात घेतल्याचे पाहायला मिळते. त्याहीपैकी जागतिक उत्पादनाच्या सुमारे ८५ टक्के उत्पादन हे एकटय़ा अमेरिका खंडातील चार देशात घेतले गेले आहे. कालांतराने उरुग्वे, परागुअवे, बोलिव्हिया, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका सारख्या देशातसुद्धा या पिकांच्या लागवडीला सुरुवात झाली. आजमितीस जागतिक उत्पादनाच्या ९९ टक्के उत्पादनांवर उल्लेखित फक्त ११ देशांमध्ये घेतले जाते. जैवतंत्रज्ञान निर्मित या पिकांच्या बाबतीत मागील काही वर्षांत उत्पादन व लागवडीखालील क्षेत्रात अपेक्षित बदल मात्र दिसत नाही. सुरुवातीच्या काळापासून सोयाबिन, मका, कापूस व तेलबिया याच पिकांचा समावेश होता. आजही जागतिक स्तरावर ९९ टक्के उत्पादन याच चार पिकांपासून घेतले जाते.